स्वप्नील जोशी पोहोचला अयोध्येत, रामललाचे दर्शन घेऊन झाला मंत्रमुग्ध
13-Apr-2024
Total Views | 67
'नाच गं घुमा' चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्नील जोशी याचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण
मुंबई : प्रभू श्रीराम यांचा ५०० वर्षांचा वनवास अखेर २२ जानेवारी २०२४ रोजी संपला. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारण्यात आले. २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) उपस्थिती दर्शवली होती. आणि त्यानंतरही अनेक कलाकर अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेत आहेत. नुकताच अभिनेता स्वप्नील जोशी याने अयोध्या दौरा केला आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्याने सोशल मिडियावर खास व्हिडिओ शेअर करत मंत्रमुग्ध झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अयोध्येतील अनुभव आपल्या पोस्टमध्ये लिहिताना स्वप्नील म्हणतो, “"२२ जानेवारी २०२४ हा दिवस माझ्यासाठी/ सगळ्यांसाठी अत्यंत भावनिक होता. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा असा होता. प्रभू श्री रामांचं अयोध्या नगरी मधील पुनरागमन, तो उद्घाटन सोहळा, ते सगळंच अतिशय भारावून जाण्यासारखं होतं. तेव्हा सोहळ्याला उपस्थित राहण्याचा योग आला नाही पण एक मात्र ठरवलं होतं की ‘याची देही याची डोळा’ प्रभू श्री रामचद्रांचं दर्शन मात्र नक्की घ्यायचं.
काही दिवसांपूर्वी अयोध्येला जाण्याचा योग जुळून आला. आणि सोबत होता माझा मित्र सौरभ गाडगीळ. आम्हा दोघांना आणि इतर काही मित्रमंडळींना प्रभूंच्या दर्शनाचं सौभाग्य लाभलं. प्रभूंचं दर्शन, सरयु नदीची आरती, हनुमान गढीचं दर्शन, अयोध्येतलं ते प्रसन्न वातावरण, ती सकारात्मकता.... सगळं सगळं मनाला फार उत्साह आणि ऊर्जा देणारं होतं. हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव इथे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे आज शब्द नाहीत, पण सरतेशेवटी, ‘ह्याच साठी केला होता अट्टाहास’ असं वाटलं. प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो हीच प्रार्थना.
दरम्यान, सध्या स्वप्नील जोशी त्याच्या आगामी ‘नाच गं घुमा’ या चित्रपटामुळे चर्चेत असून यानिमित्ताने त्याने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे असून यात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, सुप्रिया पाठारे, मायरा वैकुल, मधुगंधा कुलकर्णी आणि सारंग साठ्ये झळकणार आहेत.