मुंबई : जसा बॉस शिकवतो तसं बिचाऱ्या कार्यकर्त्यांना करावं लागतं असे प्रत्युत्तर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उबाठा गटाच्या कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकरांना दिले आहे. वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदेंची मिमिक्री केली होती. यावर प्रतिक्रिया देताना आता शिंदेंनी दरेकरांसह उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, "यात मी त्यांची चुक मानत नाही. त्या उभ्या आहेत माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. पण जसा बॉस वागतो आणि शिकवतो तसं बिचाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना करावं लागतं. त्यामुळे त्यांनी आता प्रत्येक सभेत मिमिक्री करण्याचे कामधंदे सुरु ठेवलेले आहेत. निवडणूक झाल्यानंतर त्यांच्याकडे तेच काम उरणार आहे, असं मला वाटतं," असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीकडून कल्याण लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी अंबरनाथ येथे श्रीकांत शिंदेंची मिमिक्री करत त्यांच्यावर टीका केली होती. तसेच "मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की, अंबरनाथ मधील प्रश्न काय? असं आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही विचारलं तर तो तुम्हाला झटपट सांगेल. कारण तो रोज अंबरनाथ मध्ये रस्तोरस्ती फिरतोय, तो ते अनुभवतो. जो अनुभवतो त्याच्या डोक्यामध्ये सगळे विचार क्लिअर असतात," असे त्या म्हणाल्या होत्या. यावरून आता श्रीकांत शिंदेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.