मुंबई : तुमचे राहूल गांधी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी एकदाही मातोश्रीवर का आले नाहीत? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊतांना केला आहे. संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांवर केलेल्या टीकेला आता राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
नितेश राणे म्हणाले की, "भाजपचा कुठलाही नेता हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर असल्याने मातोश्रीपर्यंत येत होता. बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाला मोठं करणारी होती. त्यामुळे त्या मातोश्रीवर पाय ठेवण्यात आमच्या नेत्यांना काहीही हरकरत नव्हती. पण आजची मातोश्री आणि उबाठा गट यांचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? ज्या काँग्रेसने आणि शरद पवारांनी वर्षानुवर्षे हिंदुत्वाचा द्वेष केला, त्यांचे पाय चाटण्याचे प्रकार आज उद्धव ठाकरे करत आहेत. त्या शिवसेनेत आणि या शिवसेनेत जमीन आसमानाचा फरक असल्याने आज कुणीही तिकडे फिरकत नाही.
"आज जवळपास चार वर्षांपासून तुमची काँग्रेससोबत महाविकास आघाडी आहे. पण तुमचे राहूल गांधी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी एकदाही मातोश्रीवर का आले नाहीत? भाजपच्या नेत्यांनी युतीमध्ये असताना मातोश्रीला जो मान दिला तो मान काँग्रेसचं नेतृत्व देतं का?" असा सवालही नितेश राणेंनी संजय राऊतांना केला आहे.