नागपूर : गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. दरम्यान, शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी सध्या संप स्थगित केला आहे.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या मुलभूत प्रश्नावर आमची चर्चा झाली आहे. त्यातील काही प्रश्न अतिशय योग्य आहेत. त्यांची एक विशेष मागणी म्हणजे कंत्राटदार शोषण करतात आणि त्यांना देय वेतन मिळत नाही. त्यामुळे थेट त्यांच्या खात्यात वेतन जायला हवं ही त्यांची मागणी आहे. याविषयी आम्ही एक यंत्रणा तयार करणार आहोत. तसेच काही ठिकाणी खात्यात वेतन गेल्यानंतर कंत्राटदार ते वेतन मागे घेत आहे. अशा प्रकारची फसवणूक योग्य नसून याबद्दलची चौकशी करणार आहे."
ते पुढे म्हणाले की, "कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी बैठक घेऊन चर्चा केली जाईल. कंत्राटी कामगारांबद्दल शासनाची भुमिका संवेदनशील असणार आहे. त्यांचे जे काही विषय आहेत त्यावर टप्प्याटप्प्याने मार्ग काढला जाईल. त्यांनी कोणत्याही प्रकारची हिंसा न करता लोकशाही पद्धतीने प्रश्न मांडल्यास आम्ही निश्चितपणे याबद्दल सकारात्मक विचार करु," असेही ते म्हणाले.
शुक्रवारी नवी दिल्ली येथे भाजप नेत्यांची बैठक पार पडली. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, "दिल्लीतील बैठक सकारात्मक झाली आहे. एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील अशी परिस्थिती सध्या नाही. परंतू, कालच्या बैठकीत ८० टक्के काम पुर्ण झालेलं आहे आणि राहिलेलं २० टक्के काम लवकरच पुर्ण होईल," असेही ते म्हणाले.