श्रीवर्धन - काळिंजे कांदळवनात पहिल्यांदाच दिसला 'कालव फोड्या' पक्षी; पक्षीप्रेमींना भुरळ

    07-Mar-2024   
Total Views |

Eurasian oystercatcher
                                                                  (छायाचित्र - मोहन उपाध्ये)


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजेच्या कादंळवनात पहिल्यादाच 'कालव फोड्या' पक्ष्याचे दर्शन झाले आहे (Eurasian oystercatcher). काळिंजे कांदळवन निसर्ग पर्यटनाअंतर्गत कांदळवन सफारीदरम्यान या पक्ष्याचे दर्शन पर्यटकांना होत आहे (Eurasian oystercatcher). सर्वसामान्यपणे या भागात न दिसणाऱ्या या पक्ष्याला पाहण्यासाठी अनेक पक्षीनिरीक्षक सध्या काळिंजेच्या कांदळवनांना भेट देत आहेत. (Eurasian oystercatcher)

श्रीवर्धन तालुक्यापासून १३ किमी अंतरावरील काळिंजे गावामध्ये १९० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन पसरले आहे. याठिकाणी खाडीच्या मध्यभागी असलेल्या बेटाभोवती कांदळवनांचे दाट आच्छादन आहे. या बेटावरच वालूकामय चिखलाच्या मैदानाचा एक मोठा भाग पसरलेला आहे. या चिखलाच्या मैदानावर अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी आढळतात. सध्या या मैदानावर 'युरेशियन आॅयस्टरकॅचर' पक्ष्याचे आगमन झाले आहे. हा पक्षी स्थलांतरित असून तो पश्चिम युरोप, रशियाचा पश्चिमेकडील भाग आणि चीन व कोरियाच्या पश्चिम किनारपट्टी प्रदेशात प्रजनन करतो. तर भारतासह आखाती देश आणि आफ्रिकेच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवर स्थलांतर करतो. भारतामध्ये दाखल होणारे हे पक्षी चीन आणि कोरियामधून स्थलांतर करुन येत असावेत, असा अंदाज आहे. हे पक्षी प्रामुख्याने पालघर, वसई येथील किनारपट्टीवर प्रामुख्याने दिसतात. मध्य आणि दक्षिण कोकणात त्यांच्या फार कमी नोंदी आहेत.

 

 

काळिंजेच्या कांदळवनात 'युरेशियन आॅयरस्टरकॅचर' हा पक्षी पहिल्यांदाच दिसत असल्याची माहिती येथील 'कांदळवन सहव्यवस्थापन समिती'चे अध्यक्ष विक्रांत गोगरकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. चिखल्याचा मैदानावर या पक्ष्यांच्या दोन जोड्या दिसत असून त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पक्षीनिरीक्षक येत आहेत. त्यामुळे काळिंजे कांदळवन निसर्ग पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गोगरकर म्हणाले. 'युरेशियन आॅयरस्टरकॅचर' हा पक्षी नावाप्रमाणेच कालवे फोडून खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. या पक्ष्यांमधील मादी आणि नर रंगाने सारखेच दिसत असले, तरी मादीची चोच ही नरापेक्षा मोठी असते.

 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.