५०० पेक्षा अधिक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर पुन्हा २२ वर्षांनी एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा आज ७ मार्च रोजी ६९ वा वाढदिवस. अनुपम मुळचे जरी हिमाचल प्रदेशचे असले तरी त्यांनी अभिनयाच्या कारकिर्दिसाठी मुंबई गाठली आणि आपली जागा निर्माण केली. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या अनुपम खेर (
Anupam Kher) यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्यासह दिग्दर्शकाची भूमिका देखील निभावली होती. आता पुन्हा एकदा अनुपम खेर प्रेक्षकांना २२ वर्षांनी दिग्दर्शक म्हणून दिसणार असून याबद्दलची घोषणा त्यांनी स्वत:च त्यांच्या सोशल मिडियावरुन दिली आहे.
तर अनुपम खेर दिग्दर्शक म्हणून ‘ओम जय जगदिश’ या चित्रपटातून २००२ रोजी समोर आले होते. मात्र, बॉक्स ऑफिसवर तग धरु न शकल्यामुळे यानंतर अनुपम खेर यांनी दिग्दर्शनाचा विचार कधीच केला नाही. पण आता पुन्हा एकदा त्यांनी कमबॅक करण्याचा विचार केला असून नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे ज्याचे दिग्दर्शन ते स्वतः करणार आहेत.
आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधत अनुपम खेर यांनी आईचा आर्शिवाद घेत त्यांच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, “माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधत मला ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आहे त्याची घोषणा मी आज करत आहे. याचे नाव आहे ‘तन्वी द ग्रेट’. काही कथा या लोकांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे, आणि माझ्या डोक्यात विचार आला की माझ्या आईच्या, देवाच्या अन् वडिलांच्या आशीर्वादानेच याची सुरुवात व्हायला हवी. या म्युझिकल चित्रपटावर मी गेले तीन वर्ष काम करत असून अखेर उद्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘तन्वी : द ग्रेट’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु करत आहे. वाढदिवशी स्वतःला नवीन आव्हान देण्याची मजा काही औरच आहे. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी असूद्यात.”
हे वाचलंत का? - “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही लोकांना..; शेतकरी आंदोलनाबद्दल अनुपम खेर यांची स्पष्ट प्रतिक्रिया
अनुपम खेर दिग्दर्शित करत असलेल्या या नव्या म्युझिकल चित्रपटाची कथा, कलाकार कोण असणार हे लवकरच समजणार आहे. अनुपम खेर यांच्या चित्रपटांबद्दल आणि कामाबद्दल बोलायचे झाल्यास ‘द कश्मिर फाईल्स’, ‘उंचाई’, ‘द वॅक्सिन वॉर’, ‘कुछ खट्टा हो जाये’ या चित्रपटांत ते झळकले होते. तर आगामी कागज २, विजय ६९ या चित्रपटांमध्ये ते दिसणार आहेत.