मुंबई : हिंदी तथा हॉलिवूड चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची भूरळ घालणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या ५३८ व्या चित्रपटाची घोषणा केली असून या चित्रपटात ते कवी-लेखक रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतील त्यांची पहिली झलक समाजमाध्यमावर प्रदर्शित केली असून प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद त्यांना कमेंटच्या माध्यमातून मिळत आहे.
अनुपम खेर यांनी दोन दशकांहुन अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत एकाहून एक दर्जेदार चित्रपट देत व्यतीत केला आहे. दीड वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मिर फाईल्स’ या चित्रपटामुळे त्यांना अधिकच लोकप्रियता मिळाली. यानंतर पुन्हा अनुपम खेर विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटात झळकणार आहेत. तसेच, कंगना रणावत हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातही ते महत्वाची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय अनुराग बसू दिग्दर्शित ‘मेट्रो इन डिनो’ या चित्रपटातही आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकणा सेम शर्मा, पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता यांच्यासोबत दिसणार आहेत.