मुंबई: आजपासून राजकोट स्थित एफएमसीजी कंपनी गोपाल स्नॅक्सचा आयपीओ गुंतवणूकदारांनसाठी शेअर बाजारात दाखल झाला आहे. आजपासून ते ११ मार्च २०२४ पर्यंत हा आयपीओ खुला असणार आहे. मंगळवारी या समभागांचे वाटप १२ मार्च २०२४ रोजी अपेक्षित आहे. कंपनीने आयपीओ प्राईज बँड प्रति समभाग (शेअर) ३८१ ते ४०१ रूपये ठेवला आहे. या आयपीओ नोंदणीसाठी कमीत कमी ३७ समभाग खरेदी करावे लागतील. त्यानंतर गुंतवणूकीसाठी कमीत कमी समभागांची संख्या ५१८ समभाग म्हणजेच १४ गठ्ठे समभाग घ्यावे लागतील. किरकोळ घाऊक गुंतवणूकदारांसाठी १४८३७ कोटी रुपयाचे समभाग शेअर बाजारात उपलब्ध असणार आहेत. कंपनीकडून ऑफर फॉर सेल (ओएफएस) (विकण्यासाठी) सुमारे ६५० कोटी रुपये किंमतीचे इक्विटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
आयपीओतून वगळलेल्या समभागांचा परतावा गुंतवणूकदारांना १३ मार्चपासून मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. अँकर (खाजगी) गुंतवणूकदारांकडून कंपनीने आयपीओ आधीच १९४.९४ कोटी रुपयांची गुंतवणूक जमवली आहे. कंपनीने शेअर बाजारात केलेल्या नोंदींप्रमाणे अँकर गुंतवणूकदारांना ४०१ रूपये प्रति समभागप्रमाणे ४८३६६५७ इक्विटी समभागांचे वाटप ५ मार्च रोजी केलेले आहे. क्वालिफाईड इन्स्टीट्यूशनल इन्व्हेसटर (पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना) आयपीओतील ५० टक्क्यांहून अधिक समभाग खरेदी करता येणार नाहीत. तसेच विना संस्थात्मक गुंतवणूकदार (नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेसटर) यांना आयपीओतील १५ टक्क्यांहून अधिक समभाग वाटा खरेदी करता येणार नाही.
कंपनीने ३.५ कोटी पर्यंतचे समभाग आपल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवलेले आहेत. कंपनीचे प्रमोटर ( संस्थापक) दक्षाबेन बिपीनभाई हडवाणी, बिपीनभाई विठ्ठलभाई हडवाणी व गोपाल ऍग्रीप्रोडक्टस आहेत. कंपनीची प्रमुख उत्पादने पापड, गाठिया, वेफर्स, नमकीन अशी विविध उत्पादने आहेत. मागील आर्थिक वर्षी गोपाल स्नॅक्सचा निव्वळ नफा १७०.५२ टक्क्याने वाढून वार्षिक महसूलात ३.१ टक्क्याने वाढ झाली होती. ग्रे मार्केटमध्ये तज्ञांच्या माहितीनुसार, ६५ रूपये प्रिमियम दराने या समभागाची विक्री सुरू आहे.
कंपनीच्या विस्तारासाठी व इतर खर्चासाठी या आयपीओतील निधीचा विनिमय केला जाईल. तज्ञांच्या मते भविष्यातील मोठ्या कालावधीतील गुंतवणूकीसाठी हा आयपीओ लाभदायक ठरू शकतो.