"काँग्रेस सत्तेत आल्यास CAA कायदा रद्द करणार"

काँग्रेस नेते पवन खेरा यांचे आश्वासन

    06-Mar-2024
Total Views |
Congress 
 
दिसपूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेत आल्यास नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा २०१९ (CAA) रद्द करण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी दिली. आसाममधील गुवाहाटी येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, "आतापर्यंत १९७१ ची कट ऑफ डेट आसामसाठी होती, परंतु सीएए आल्याने हे अधिकार त्यांच्याकडून काढून घेतले जातील. त्यामुळेच आम्ही सीएए कायदा रद्द करु"
 
काय आहे सीएए कायदा?
नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा २०१९ हा बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून भारतात येणाऱ्या हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारशींना नागरिकत्व देते. २०१९ मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहात सीएए कायदा मंजूर झाला होता. पुढील काही दिवसांमध्ये सीएए कायदा देशभरात लागू करण्यात येईल, अशी चर्चा सुरु आहे. लवकरच नियमावली जाहीर करुन तीन्ही देशांतून आलेल्या हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी धर्माच्या नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येईल, अशी चर्चा सुरु आहे.
 
 
सीएए कायद्याला विरोध का?
केंद्र सरकारच्या आरोपानुसार, देशातील विरोधी पक्ष खासकरुन काँग्रेस मुस्लीमांना सीएएच्या विरोधात भडकावत आहेत. सीएए कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. तरीही मुस्लीमांच्या मनात सीएए आल्यानंतर नागरिकत्व जाण्याची भीती टाकण्यात येत आहे, असा आरोप सत्ताधारी पक्षाचा आहे.
 
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या मते, या कायद्यामुळे भारताच्या धर्मनिरपेक्षतेला धोका आहे. हा कायदा मुस्लीमांसोबत भेदभाव करत आहे. सरकारने मुस्लीमांचे नागरिकत्व काढून घेण्यासाठी हा कायदा आणला आहे, असा आरोप विरोधी पक्ष करत आहेत.