मॉरिशसमधून हिंद महासागरावर लक्ष

    05-Mar-2024   
Total Views |
modi


चीनच्या आक्रमकतेला वेसण घालण्यासाठी, भारताला मॉरिशससारख्या देशांशी असलेले आपले संबंध आणखी सुदृढ करावे लागतील. त्यासोबतच हिंद महासागरात अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान आणि ब्रिटन यांसारख्या देशांच्या नौदलांसोबत सहकार्य वाढवावे लागेल.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंड जुगनाथ यांनी दि. १ मार्च रोजी मॉरिशसच्या अगलेगा बेटावर धावपट्टी आणि जहाजांसाठी धक्क्याचे लोकार्पण केले. या प्रकल्पांमुळे हिंद महासागरात महत्त्वाच्या ठिकाणी भारताला स्थान मिळणार आहे. मॉरिशसची राजधानी सेंट लुईच्या ईशान्येस सुमारे १ हजार,२०० किमीवर असणार्‍या अगलेगा उत्तर आणि दक्षिण अशा दोन बेटांचे एकत्रित क्षेत्रफळ हे सुमारे २४ चौरस किमी असून, त्याची लोकसंख्या सुमारे ३०० एवढीच. मुख्यतः नारळाच्या बागा आणि मासेमारीवर अवलंबून असणार्‍या या लोकांचा मॉरिशसच्या मुख्य बेटांशी आजवर केवळ समुद्रमार्गे संबंध होता. तेथे असलेली धावपट्टी नादुरुस्त होती. मॉरिशस सरकारने २००३ सालापासून ही धावपट्टी बांधण्याचे अनेक प्रयत्न केले; पण त्यात त्यांना यश आले नाही. २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॉरिशसला भेट दिली असता, याबाबतचा प्रस्ताव त्यांच्या समोर सादर करण्यात आला. मोदींनी या प्रकल्पाला तत्काळ मंजुरी दिली.

भारत आणि मॉरिशस यांच्यामध्ये सांस्कृतिक नाते आहे. मॉरिशसच्या १२ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ७० टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. युरोपातून आफ्रिकेला वळसा घालून, भारतात येताना मॉरिशसचे स्थान महत्त्वाचे असल्यामुळे, १८व्या शतकात तिथे फ्रेंचांनी वसाहत स्थापन केली. १९व्या शतकात मॉरिशस ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. दोघांनीही मॉरिशसमध्ये उसाच्या शेतात तसेच अन्य कामांसाठी भारतीय मजूर नेले. अशा प्रकारे सुमारे पाच लाख भारतीय तिथे स्थायिक झाले. त्यापैकी सुमारे ४० हजार मजूर मुंबई बंदरातून पाठवण्यात आले होते आणि ते मुख्यतः मराठी भाषिक होते. मॉरिशसच्या लोकसंख्येपैकी सुमारे ४८ टक्के लोकसंख्या हिंदू धर्मीय असून, त्यांच्या मनात रामायण आणि प्रभू श्रीरामांबद्दल विशेष स्थान आहे. मॉरिशसमध्ये अशनीपातामुळे तयार झालेल्या तलावाला ’गंगा तलाव’ असे नाव देण्यात आले असून, महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला सुमारे पाच लाख भाविक भेट देतात. भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजे १९४८ साली मॉरिशसशी राजनयिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हा मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. १९६८ साली मॉरिशसने ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वतंत्र होण्यासाठी, १२ मार्च हा दिवस निवडला; कारण याच दिवशी महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला होता.
 
भारत आणि मॉरिशस यांच्यातील व्यापारी संबंध देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. दोन्ही देशांमध्ये दुहेरी कर आकारणी न करण्याबद्दल झालेल्या करारामुळे भारतात होणार्‍या थेट परकीय गुंतवणुकीपैकी सुमारे २६ टक्के गुंतवणूक ही एकट्या मॉरिशसहून झाली आहे. गेल्या दोन दशकांतील गुंतवणुकीचा आकडा तब्बल १६१ अब्ज डॉलर इतका आहे. भारताने मॉरिशसला एक अब्ज डॉलरचा कर्जपुरवठा केला असून, ४० कोटी डॉलर मदत केली आहे. भारताची ‘जनौषधी योजना’ स्वीकारणारा मॉरिशस हा पहिला देश ठरला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान जुगनाथ गेल्या सहा महिन्यांत पाच वेळा भेटले आहेत. ‘कोविड १९’चा सामना करण्यासाठी, भारताकडून मॉरिशसला एक लाख लसींचा पुरवठा करण्यात आला होता. या व्यतिरिक्त मॉरिशसने भारताकडून तीन लाख लसी विकत घेतल्या होत्या. २०२१ साली भारताला आवश्यकता असताना, मॉरिशसने २०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स पाठवले होते. दि. २५ जुलै २०२० रोजी मॉरिशसमधील किनार्‍यांवर तेलाचा तवंग पसरला. तेव्हा भारत सगळ्यात पहिले मदतीला धावून आला. भारतीय वायुदलाच्या एका विशेष विमानाने ३० टन मदत साहित्य आणि दहा तंत्रज्ञांचा चमू पाठवला. दि. १६ ऑगस्ट २०२० रोजी मॉरिशसचे एक जहाज अपघातग्रस्त झाले असता, त्याला वाचवण्यासाठीही भारताने ’आयएनएस निरीक्षक’ ही युद्धनौका पाठवली होती.

सांस्कृतिक पातळीवरही भारत आणि मॉरिशसमध्ये भरीव संबंध आहेत. महाराष्ट्राचे मॉरिशसशी विशेष नाते आहे. आज मराठी पूर्वज असणार्‍या, मॉरिशसच्या नागरिकांची संख्या सुमारे ७५ हजार आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॉरिशसला भेट देऊन, तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण केले. तेथील लोकांशी संवाद साधताना, फडणवीसांनी महाराष्ट्र शासनातर्फे मॉरिशसच्या मराठी मूळ असलेल्या लोकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्त्या जाहीर केल्या. महाराष्ट्र सरकारने मॉरिशसमध्ये बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी ४.४ कोटी रुपयांची मदत केली आहे. फडणवीस आणि मॉरिशसचे परिवहन मंत्री अ‍ॅलन गानू यांच्या उपस्थितीत ’आर्थिक विकास मंडळ मॉरिशस’ आणि ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’ यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.२०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॉरिशसच्या स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून तेथे भेट दिली. या भेटीदरम्यान अगलेगाच्या विकासाबद्दल सहकार्य करार करण्यात आला होता. या घटनेला नऊ वर्षं पूर्ण होत असताना, अगलेगामधील जहाजांसाठी धक्का आणि नौदलाची विमाने उतरू शकतील, एवढी मोठी धावपट्टी बांधून पूर्ण झाली आहे.
 
यामुळे मॉरिशसच्या सुमारे २३ लाख चौरस किमी विशेष आर्थिक क्षेत्राच्या दहशतवादी आणि सागरी चाच्यांपासून संरक्षणाला मदत होणार आहे. अगलेगा बेटांपासून मालदीवची राजधानी माले सुमारे २ हजार, ५०० किमी अंतरावर आहे. त्यामुळे तेथून नौदलाच्या विमानांना मालदीव, तांबड्या समुद्राचे प्रवेशद्वार, मादागास्कर ते पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेपर्यंत टेहळणी करणे शक्य होणार आहे.भारत मॉरिशसमध्ये नौदलाचा तळ उभारत असून, त्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे, असा प्रचार करण्यात आल्यामुळे, या प्रकल्पांविरोधात आंदोलन उभे राहिले होते. पण, पंतप्रधान प्रविंड जुगनाथ यांनी या आरोपांना सपशेल फेटाळून लावले. या आंदोलनामागे चीनची चिथावणी असल्याचा संशय आहे. भारतानेही याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून, भारताने जमिनीप्रमाणेच सागराने जोडल्या गेलेल्या देशांनाही शेजारी देश म्हणून मानायला सुरुवात केली. त्यादृष्टीने श्रीलंका, मालदीव, मॉरिशस, सेशल्स, रीयुनियन, कॉमरॉस आणि मादागास्कर यांसारख्या देशांना विशेष महत्त्व देण्यात आले. भारतीय नौदलाकडे सध्या १३२ युद्धनौका १४३ विमाने आणि १३० हेलिकॉप्टर्स असून ६७ युद्धनौकांचे बांधकाम चालू आहे. अमेरिकेकडे २९४ युद्धनौका आहेत. चीनकडे २०२५ पूर्वी ४०० युद्धनौका सज्ज असणार आहेत. सुरुवातीला नौदल हे चीनची लंगडी बाजू होते. पण, गेल्या काही वर्षांमध्ये चीनने नौदलावर प्रचंड खर्च केला आहे.

स्वतःला दक्षिण चीन समुद्रापुरते मर्यादित न ठेवता, चीनचे नौदल आता प्रशांत महासागर आणि हिंद महासागरात सर्वत्र संचार करत आहे. श्रीलंकेतील हंबनटोटा, पाकिस्तानमधील ग्वादर आणि इरिट्रियामधील जिबुती येथे चीनचे नाविक तळ आहेत. याशिवाय चीनच्या अनेक मच्छीमारी नौका आंतरराष्ट्रीय समुद्रात मासेमारीच्या निमित्ताने टेहळणी करतात. चीनच्या आक्रमकतेला वेसण घालण्यासाठी, भारताला मॉरिशससारख्या देशांशी असलेले आपले संबंध आणखी सुदृढ करावे लागतील. त्यासोबतच हिंद महासागरात अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान आणि ब्रिटन यांसारख्या देशांच्या नौदलांसोबत सहकार्य वाढवावे लागेल. यात भारताने आजवर जपलेली अलिप्ततावादी प्रतिमा आड येत होती. पण, गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या भूमिकेत स्पष्टता आली आहे. ही स्पष्टता कृतीत दिसणे, हे अधिक महत्त्वाचे आहे.

अनय जोगळेकर


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.