वाहनचालकांच्या सुरक्षा खबरदारीसाठी पालिका कटिबद्ध!

गोखले पुल आणि बर्फीवाला पूल जोडणीचे काम दुसऱ्या टप्प्यासोबत हाती घेण्यात येणार!

    05-Mar-2024
Total Views |
Gokhale Bridge


मुंबई : 
अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे बांधकाम करताना त्याची उंची रेल्वे प्रशासनाच्या धोरणानुसार वाढवण्यात आली, परिणामी पुलाचे पोहोच रस्ते देखील अधिक उंच झाले. याचा परिणाम म्हणून बर्फीवाला पुलाच्या दिशेने तीव्र उतार तयार झाला. वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतक्या तीव्र उतारावर आहे, त्या स्थितीत जोडणी करणे शक्य नाही. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) संस्थेची मदत घेण्यात येत असून लवकरच त्यांच्याकडून सूचना अपेक्षित आहेत.

या सूचना प्राप्त होताच गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये बर्फीवाला पुलाची जोडणी करण्याचा समावेश करून ती कामे हाती घेण्यात येतील, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर निर्माण झाल्याचा मुद्दा प्रसारमाध्यम आणि समाजमाध्यमातून सातत्याने चर्चेत आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून वस्तुस्थितीदर्शक माहिती देण्यात आली आहे.


हे ही वाचलंत का? >>  दक्षिण मुंबईतील केबल-स्टेड पूल लवकरच प्रवाशांच्या सेवेत; सेंटर पायलॉन प्रणालीचा वापर
 

बृहन्मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्राधिकरण, सल्लागार यांच्यासोबत सातत्याने बैठका घेऊन बर्फीवाला पूल हा गोखले पुलासोबत जोडण्यासाठी अनेक पर्यायांवर विचारमंथन करण्यात येत आहे. दरम्यान, गोखले पुलाचा पहिला टप्पा दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी खुला करून देण्यात आला. तर अगोदरच नियोजित केल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील कामासोबतच दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

सद्यस्थितील रेल्वे भागातील पुलाची पातळी व बर्फीवाला जंक्शन येथे पुलाची पातळी यामध्ये दोन्ही पुलाच्या उंचीतील फरक हा २.८३ मीटर इतका आहे. वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांना दिलासा देतानाच त्यांच्या सुरक्षिततेचा देखील विचार करणे हा बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा अग्रक्रम आहे. सर्व स्थितीवर उपाययोजना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असून व्हीजेटीआय संस्थेने सुचवलेल्या शिफारशी प्राप्त होताच त्यांचा अवलंब करून बर्फीवाला पूल आणि गोपाळ कृष्ण गोखले हे दोन्ही पूल जोडण्याच्या कामासाठी लवकरच सुरूवात करण्यात येईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.