महाराष्ट्र : आगामी लोकसभा २०२४ मध्ये राज्यातील सर्व ४८ लोकसभेच्या जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील ६ मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी अकोला येथे झालेल्या पक्षाच्या लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या व लोकसभा कोअर कमिटीच्या बैठकीत शाह बोलत होते.
शाह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा संकल्प प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रत्येकाने झटून कामाला लागावे लागेल. कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या आणि विकासकामांच्या आधारावर मते मागायची आहेत. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेशी संपर्क प्रस्थापित करावा.
मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक विकासाचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. देशाच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एनडीए विजयी होणे आवश्यक असल्याचे मतदारांना पटवून दिले पाहिजे, असेही शाह यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि निवडणूक व्यवस्थापन समिती, लोकसभा कोअर कमिटीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत शाह यांनी अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ-वाशीम, वर्धा व चंद्रपूर या मतदारसंघांतील पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला.