"सूर्यासारखी तेजस्वी व्यक्ती पुढच्या पिढीला कळण्यासाठी..."; 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाबद्दल सलील कुलकर्णींची पोस्ट

    26-Mar-2024
Total Views | 68
रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनीत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सध्या प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळवत आहे.
 

savarkar movie 
 
मुंबई : मराठी कलाकारांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाची विशेष भूरळ पडली आहे असेच म्हणावे लागेल. रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा? आणि यात रणदीपने कसे काम केले आहे याची वैयक्तिक मतं असेन मराठी कलाकार सोशल मिडियावर सध्या मांडत आहेत. संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी देखील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी, “सावरकरांबद्दल अधिकाधिक माध्यमांतून माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे”, असे म्हटले आहे.
 
हे वाचलंत का? - सावरकर प्रेमी म्हणून हिंदी दिग्दर्शक रणदीप हुड्डाचे आभार – योगेश सोमण  
 
सलील कुलकर्णी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तुजसाठी मरण ते जनन. तुजवीण जनन ते मरण .. हे म्हणणारे आणि ते जगण्यात आचरणारे .. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ह्यांच्यावरचा हा चित्रपट तुम्ही बघाच. तुमच्या मुलांनाही दाखवा.. !! एक महाकवी , एक प्रखर बुद्धिमत्ता असणारे नाटककार आणि स्वतःच्या घरावर निखारे ठेवणारे एक क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर. अशा व्यक्तीवर प्रत्येक पिढीने कलाकृती करावी आणि पुढच्या पिढीला दाखवावी आणि तरीही संपूर्णपणे आपल्याला मांडता येणार नाही अशी ही सूर्यासारखी तेजस्वी व्यक्ती आज चित्रपट पाहताना पुन्हा पुन्हा जाणवलं कि पुढच्या पिढीला सावरकर कळण्यासाठी पुस्तकं , नाटक , चित्रपट अश्या जेवढ्या माध्यमातून त्यांचे विचार आणि साहित्य मांडता येईल तेवढे मांडायला हवे. आपल्या देशांत जे महाकवी होऊन गेले त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर. ह्यात कोणत्याही मराठी भाषा कळणाऱ्या माणसाला शंका असणार नाही."
 

savarkar  
 
पुढे कुलकर्णी लिहितात, "सावरकरांसारख्या व्यक्तीवर चित्रपट करण्याचं शिवधनुष्य पेलण्याचा रणदीप हुड्डा ह्यांनी जीव तोडून केलेला प्रयत्न प्रत्येक फ्रेम मध्ये दिसतो. एवढे पैलू असलेली ही व्यक्ती मांडणं हे अतिशय अवघड काम आहे. आणि मला वाटतं काही कलाकृती समीक्षे पलीकडच्या असतात. त्यातली ही एक.. !! ती अनुभवावी.. !! मुलांना दाखवावी.. आपण रोज वापरतो त्यातले चित्रपट, दिग्दर्शक, संपादक असे अनेक मराठी शब्द कुणी निर्माण केले ? कुणी आपल्या ऐन तारुण्यातली अनेक वर्ष तुरुंगात काढली? अशी व्यक्ती, त्यांचं जीवन आपण पुन्हा पुन्हा स्मरायला हवं."
 
दरम्यान, २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाने आत्तापर्यंत १०.९६ कोटींची यशस्वी कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. तसेच, सुप्रिया पिळगांवकर, अजय पुरकर, प्रवीण तरडे, योगेश सोमण अशा अनेक मराठी कलाकारांनी व्हिडिओ अथवा पोस्टच्या माध्यमातून रणदीप हुड्डाच्या या कलाकृतीचे कौतुक केले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121