हिंदू जीवनाचे तत्वज्ञान देशाला दिशा दाखविण्यास सक्षम!
सुरेशजी सोनी यांचे प्रतिपादन
26-Mar-2024
Total Views |
नागपूर : "केवळ हिंदू जीवन तत्त्वज्ञानच देशाला दिशा देऊ शकते. त्याग आणि आत्मसमर्पण ही आपली मूल्ये आहेत. यातूनच आपला समाज घडवायचा आहे. आपण एक चैतन्यशील सामाजिक जीवन निर्माण करू शकतो. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेशजी सोनी (Suresh Soni Hindu) यांनी केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि हिंदु धर्म संस्कृती मंदिर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चिटणवीस सेंटर येथे संघाचे ज्येष्ठ प्रचारक ‘तरुण भारत’चे माजी संपादक स्व. मा. गो. वैद्य स्मृति व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी 'हिंदू जीवनाच्या तत्त्वज्ञानाची सर्वसमावेशकता' या विषयावर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी होते तर हिंदु धर्म संस्कृती मंदिर नागपूरचे अध्यक्ष मनोज वाघ यांची विशेष उपस्थिती होती.
सुरेशजी सोनी म्हणाले, " मा. गो. वैद्य हे एक विचार होते. त्यांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले. त्यांचे जीवन प्रेरणादायी, अर्थपूर्ण आणि जीवनमूल्यांवर आधारित होते. धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान इत्यादी समकालीन आणि गंभीर विषयांवरील त्यांचे लेखन असून आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे."
पुढे ते म्हणाले, " भारतीय जीवनपद्धती सर्वसमावेशक आहे. यामध्ये प्राणी, पक्षी, वनस्पती इत्यादींसह सर्वांचा सहिष्णुतेने विचार केला जातो. ईश्वर तत्व सर्वांमध्ये व्याप्त आहे. या विशाल व्यवस्थेत आपण सर्वजण त्या विशालतेचे अंश आहोत. आपली हिंदू विचारधारा समन्वयाची आहे." कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मनोज वाघ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. पाहुण्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या त्रैमासिकाच्या २४ व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता 'वंदे मातरम' ने झाली.