दिसपूर : भारतीय तपास यंत्रणांना दहशतवादी कारवायांविरोधात मोठे यश मिळाले आहे. काही दिवसांपूर्चीच तपास यंत्रणांनी इसिसचा भारतीय प्रमुख हरिस फारुकी उर्फ हरीश अजमल फारुकी याला अटक केली होती. यासोबतच आता तपास यंत्रणांनी आयआयटी गुवाहाटीचा विद्यार्थी तौसिफ अली फारुकी याला इसिसशी संबंध असल्याच्या आरोपाखाली बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (यूएपीए) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
उल्लेखनीय आहे की, आरोपी तौसिफ अली फारुकी हा आयआयटी गुवाहाटीमध्ये बायोसायन्सचा चौथ्या वर्षाचा विद्यार्थी असून त्याला शनिवारी अटक करण्यात आली होती. आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सचे (एसटीएफ) महानिरीक्षक पार्थसारथी महंत म्हणाले की, त्याची चौकशी केल्यानंतर आम्हाला त्याचे इसिसशी संबंध असल्याचे विश्वसनीय पुरावे मिळाले आहेत. त्याआधारे त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधिकारी पार्थसारथी महंत म्हणाले की, आम्ही आरोपी विद्यार्थ्याला न्यायालयात हजर केले, न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आम्ही आयआयटी-गुवाहाटी कॅम्पसमध्ये त्याच्या वसतिगृहाची खोली देखील शोधली. दिल्लीतील रहिवासी असलेल्या फारुकीला भारतीय दंड संहिता आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या अनेक कलमांखाली अटक करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.
इसिसमध्ये सामील होण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. उल्लेखनीय आहे की इसिस इंडियाचा प्रमुख हरीश फारुकी उर्फ हरीश अजमल फारुकी आणि त्याचा साथीदार अनुराग सिंग उर्फ रेहानला बांगलादेशातून भारतात येताना धुबरी जिल्ह्यात अटक केल्यानंतर तीन दिवसांनी आरोपी विद्यार्थी तौसिफला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सांगितले की, आयआयटी-गुवाहाटीचे दोन विद्यार्थी इसिसमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यापैकी एक सापडला असला तरी दुसरा सापडला नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही त्याचा शोध घेत असून लवकरच त्याला पकडू. आम्ही आरोपीच्या पालकांना कळवले आहे. तो दिल्लीतील बाटला हाऊस भागातील रहिवासी आहे. केंद्रीय यंत्रणांना कळवण्यात आल्याचेही सरमा म्हणाले.