भारताची ‘डिजिटल’ भरारी

    21-Mar-2024   
Total Views |
Digital payment

भारताने ‘ई-वॉलेट्स’ आणि ‘युपीआय’च्या माध्यमातून घेतलेली डिजिटल भरारी ही केवळ थक्क करणारी आहे. केवळ शहरांतच नाही, तर खेडेगावांमध्येही डिजिटल व्यवहारांची व्याप्ती वाढलेली दिसते. म्हणूनच आता ‘युपीआय’ हे सातासमुद्रापारदेखील पोहोचलेले दिसते. त्यानिमित्ताने भारताच्या या डिजिटल प्रगतीचा सर्वंकष आढावा घेणारा हा लेख...

जगभरात आज आवर्जून भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युपीआय’ (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) ची सुविधा जगातील अनेक देशांनीही स्वीकारली आहे. त्यामुळे एकूणच भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती कौतुकास्पद.नुकताच ‘पेटीएम पेमेंट्स’ बँकेवर निर्बंध घालण्याचा निर्णय ‘रिझर्व्ह बँके’ने घेतला. ‘पेटीएम पेमेंट्स’ बँकेने नियामक मापदंडाचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेला हा निर्णय घ्यावा लागला. सरकारने २०१६ मध्ये अचानक नोटाबंदी जाहीर केली. त्यानंतरच्या काळात डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ‘कॅशलेस इंडिया’सारखी योजनादेखील आणली. आकर्षक कॅशबॅक ऑफर आणि ई-वॉलेटमुळे मिळणार्‍या सवलती पाहून ग्राहकवर्ग ऑनलाईन खरेदी व कॅशबॅक पेमेंटकडे वळला.

‘ई-वॉलेट’ किंवा ‘डिजिटल वॉलेट’ हे ‘मनीपर्स’चे डिजिटल रुपांतर. यामध्ये असणारी रक्कम ही व्हर्च्युअल असते.स्मार्टफोनमध्ये अ‍ॅपच्या स्वरूपात डिजिटल वॉलेट उपलब्ध होऊ शकते. या अ‍ॅपद्वारे सामानाची खरेदी, प्रवासाची तिकिटे, चित्रपटाची तिकिटे इत्यादी अगदी सहज काढता येतात व त्यांचे ऑनलाईन पेमेंटही करता येते. इतरांनादेखील अ‍ॅपद्वारे पैसे पाठविता येऊ शकतात. पैसे बँकेतून वॉलेटमध्ये आणि वॉलेटमधून प्रत्यक्ष वापरात, असा हा व्यवहार. डिजिटल वॉलेटमध्ये सर्वप्रथम आपले बँकेचे खाते किंवा डेबिट कार्ड यांचे तपशील भरावे लागतात. त्यानंतर पासवर्ड व पेमेंटविषयक तपशील द्यावा लागतो. या प्रकारे बँकेतून वॉलेटमध्ये पैसे भरता येतात. पैसे जमा करण्याकरिता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अथवा ऑनलाईन बँकिंगचा वापर करता येतो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. वॉलेटमधून आपण कोणालाही पेमेंट करू शकता किंवा खरेदीही करू शकता.

डिजिटल वॉलेटचा फायदा

सर्वात म्हणजे खिशात रोखरक्कम बाळगावी लागत नाही. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड नसेल तरी वस्तूंची खरेदी करता येते किंवा सेवांसाठी शुल्क मोजता येते. बँकेच्या खात्यावरची कोणतीही माहिती उघड होण्याची शक्यता कमी असते. ई-वॉलेट हे प्री-पेड असतात. त्यामुळे वापर करताना पेमेंट नाकारले जाण्याची शक्यता नसते. ई-वॉलेटचाही वापर सुरक्षित असतो. आपण केलेल्या प्रत्येक व्यवहारानंतर आपल्याला एसएमएसद्वारे सूचना मिळते. मात्र, हे सगळे करताना ई-वॉलेटचा तपलशील व पासवर्ड कोणालाही सांगू नये.डिजिटल वॉलेटचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी कितीही तुम्ही निवडू शकता. ‘पेटीएम’, ‘गुगल पे’ ‘फोन पे’, ‘अ‍ॅमेझॉन पे’, ‘मोबिक्विक’, भीम अ‍ॅप, शिवाय विविध बँकांचीही अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. त्यामुळे अधिकाधिक लोक आज डिजिटल वॉलेटचा पेमेंट पर्याय म्हणून वापर करतात. ‘युपीआय’ पेमेंट सिस्टीम सुरू होण्यापूर्वी ऑनलाईन पेमेंटसाठी ‘डिजिटल वॉलेट’ हा एकमेव पर्याय होता. ‘युपीआय’ पेमेंटमुळे डिजिटल वॉलेटला एक मजबूत प्रतिस्पर्धी निर्माण झाला. मात्र, कोणता पर्याय चांगला याचा वापरणार्‍यांना संभ्रम निर्माण होतो.

‘युपीआय’ पेमेंट सिस्टीम व डिजिटल वॉलेट पेमेंट सिस्टीम यांच्यात काही मूलभूत फरक नक्कीच आहे. ‘युपीआय’ ही एक ‘इन्स्टंट रिअल टाईम पेमेंट सिस्टीम’ आहे, तर डिजिटल वॉलेट-बँक दोन खात्यांमधील मध्यस्थ आहे. ‘युपीआय’द्वारे एका बँकेतून दुसर्‍या बँकेत व्यवहार होतात. वॉलेटमार्फत पैसे दुसर्‍या ई-वॉलेट वापरकर्त्याच्या वॉलेटमध्ये पाठविता येतात. ‘युपीआय’ हे ‘नॅशनल पेमेंट्स कॉपोरेशन ऑफ इंडिया’ने विकसित केले आहे. ‘फिनटेक’ कंपन्या व बँका स्वत:च्या वॉलेटमार्फत देखील ही सुविधा देतात. बँक खाते लिंक केल्यानंतर ई-वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करता येतात. प्रत्येक व्यवहारासाठी ‘युपीआय’मध्ये दोन लाख रुपयांपर्यंत मर्यादा आहे. डिजिटल वॉलेटमध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपये भरता येतात. ‘युपीआय’मधून तत्काळ पैसे पाठवता येतात. ‘ई-वॉलेट’मध्ये पैसे पाठविताना अनेक प्रक्रिया असतात.

‘ई-वॉलेट’ची सुरक्षितता

सहा अंकी पिन नंबर निश्चित करा आणि हा नंबर ‘ई-वॉलेट’वर व्यवहार करणार्‍यालाच फक्त माहीत हवा. लॉगइन करताना मोबाईलचा पासवर्ड विचारला जात असल्यामुळे सुरक्षा चांगली असते. फिंगरप्रिंट स्कॅनिंगचा पर्याय असेल, तर अधिक चांगले. व्यवहार झाल्यावर पटकन लॉग-आऊट करा. खात्याची माहिती कोणलाही सांगू नका. सर्व व्यवहारांवर लक्ष राहावे, यासाठी एसएमएस सुविधा सुरू करण्यात आली आहे. म्हणूनच ‘ई-वॉलेट’, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी जोडणे आवश्यक आहे. ‘ई-वॉलेट’ वापरुन कोणत्याही व्यवहार करताना सावधगिरी म्हणून वजा झालेल्या पैशाची पुन्हा तपासणी करा. फसवणूक किंवा कोणत्याही ऑनलाईन चोरी आढळल्यास तक्रार नोंदविण्यासाठी २४ु७ ग्राहक सेवा क्रमांक व हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहेत. फसवणुकीच्या प्रकरणाची नोंद तीन दिवसांत केली, तर संपूर्ण रक्कम परत मिळते.
 
चार ते सात दिवसांत नोंद केली, तर व्यवहाराची रक्कम किंवा दहा हजार रुपये, जे कमी असेल, ते परत केले जातात. सात दिवसांनंतर नोंद करण्यात आली, तर परत मिळणारी रक्कम त्या ‘ई-वॉलेट’ कंपनीच्या ‘भारतीय रिझर्व्ह बँके’च्या धोरणाप्रमाणे नियमांचे पालन करतात. डिजिटल पेमेंटची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सरकारने विविध उपक्रम आणि धोरणांद्वारे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. एकूणच भारतात डिजिल पेमेंटचे भविष्य आशादायक आहे. देशातील पेमेंटच्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची आणि आर्थिक सर्वसमावेशकतेची क्षमता ‘युपीआय’मध्ये आहे.

भारतातील डिजिटल पेमेंटमध्ये येत्या काही वर्षांत वाढ कायम राहील, अशी अपेक्षा आहे. जानेवारी २०२३ मध्ये भारतात केलेल्या सर्व डिजिटल पेमेंट व्यवहारांचे मूल्य १२.९८ लाख कोटी रुपये हेाते. भारतात २१ कोटींहून अधिक मोबाईल वॉलेट वापरकर्ते आहेत आणि २०२५ मध्ये हा आकडा ४३ कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. भारतातील मोबाईल वॉलेट व्यवहारांचे प्रमाण २५ अब्ज आहे आणि २०२५ पर्यंत ते ७१ अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये ‘युपीआय’ची प्रणाली सादर झाली आहे आणि आता फ्रान्स, युएई, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, भूतान आणि नेपाळ या सात देशांमध्ये भारताच्या ‘युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस’द्वारे देयक आता स्वीकारली जातील. तसेच मलेशिया, थायलंड, फिलिपीन्स, व्हिएतनाम, कंबोडिया, दक्षिण कोरिया, तैवान आणि हाँगकाँग आदी देशाबरोबर भागीदारी केली आहे. जपानदेखील भारताच्या ‘युपीआय’ पेमेंट सिस्टीममध्ये लवकरच सामील होऊ शकेल.

जागतिक स्तरावर ‘युपीआय’ची पोहोच वाढविण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. गेल्यावर्षी भारताने ‘जी २०’ परिषदेमध्ये ‘युपीआय’ प्रणालीचे प्रदर्शनदेखील केले. त्या परिषदेत सहभागी सदस्यांना फोनवर रिअल टाईम व्यवहारांचा अनुभव घेता आला.
पेटीअम वॉलेटचे ४० कोटी वापरकर्ते होते. हे ‘वन-९७ कम्युनिकेशन लिमिटेड’चे भारतातील सर्वांत लोकप्रिय डिजिटल वॉलेट होते. पण, सध्या याचेभवितव्य अंधारात आहे. त्यानंतर ‘गुगल पे’चे ३० कोटी वापरकर्ते असून, हे गुगल कंपनीचे सर्वांत लोकप्रिय डिजिटल वॉलेट मानले जाते.


-शशांक गुळगुळे

 

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.