"राऊत, ठाकरे आणि दाऊद इब्राहिम या तिघांनी मुंबईसह कोकणप्रांत नासवला!"
चित्रा वाघ यांचा घणाघात
21-Mar-2024
Total Views |
मुंबई : संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि दाऊद इब्राहिम या तिघांनी मुंबईसह कोकणप्रांत नासवला, असा घणाघात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊतांवर केला आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी करत त्यांच्यावर टीका केली होती. यावर आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्या 'X' अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये चित्रा वाघ म्हणाल्या की, "संजय राऊत तुमच्या लॅाजिकने बोलायचं झालं तर तुम्ही, तुमचे नेते उद्धवजी आणि दाऊद इब्राहिम तिघेही कोकणात जन्मलात. तुम्ही तिघांनीही मुंबईसह कोकणप्रांत नासवला. पण या परिसरात जन्माला आलेल्या इतर शेकडो कर्तृत्ववानांनी तर त्याची किर्ती वाढवलीच. त्यामुळे कोण कुठे जन्माला आलं, यावरून तुम्ही कुठल्याच प्रांताला किंवा राज्याला कमीपणाने लेखण्याचं कारण नाही."
"गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला असेल, पण त्याच भूमीत महात्मा गांधींसारखे जगाला वंदनीय महापुरूषही जन्माला आले. गुजरातचा गौरव महात्मा गांधींमुळे आहे. औरंगजेबामुळे नाही आणि त्याच गुजराती भूमीने नरेंद्रजी मोदींसारखा महान कर्मयोगी पंतप्रधानही दिलाय. ही नुसती गुजराती बांधवांसाठी नाही, तर अवघ्या भारतवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे," असे त्या म्हणाल्या.
आता तुमच्या याच लॅाजिकने बोलायचं तर तुम्ही, तुमचे नेते उद्धवजी आणि दाऊद इब्राहिम तिघेही कोकणात जन्मलात. तुम्ही तिघांनीही मुंबईसह कोकणप्रांत नासवला. पण या परिसरात जन्माला आलेल्या इतर शेकडो कर्तृत्ववानांनी तर…
त्या पुढे म्हणाल्या की, "निवडणुकीचं घोडामैदान जसजसं जवळ येत चाललंय, तसतसं सोईस्कर इतिहासाच्या नशेत झिंगलेलं तुमच्या बुद्धीचं घोडं पेंड खाऊ लागलेलं दिसतंय. पण स्वतःला सांभाळा; अजून मोहीम सुरू व्हायची आहे. मराठी मावळ्यांनी ह्याच मातीत दफन केलेल्या औरंगजेबाची मदत घेऊन महाराष्ट्र जिंकायची स्वप्नं बघू नका," असेही त्या म्हणाल्या.