वंचित आणि मविआत फिस्कटलं? राऊत म्हणतात, "त्यांनी आमचा प्रस्ताव..."

    21-Mar-2024
Total Views |
 
Sanjay Raut & Prakash Ambedkar
 
मुंबई : प्रकाश आंबेडकरांनी आमचा प्रस्ताव मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहूजन आघाडीमध्ये बिनसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
 
"प्रकाश आंबेडकरांशी आमची अनेकदा चर्चा झाली. आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर आम्हाला त्यांची एक वेगळी भूमिका दिसली. तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता. संविधान वाचवण्याच्या या लढ्यात बाळासाहेब आंबेडकर आमच्यासोबत असते तर या लढ्याला नक्कीच गती आणि बळ मिळालं असतं. पण सगळे प्रमुख नेते एकत्र बसून पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करतील आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  मनसे आणि महायूतीत खलबतं! राज ठाकरेंनी घेतली शिंदे-फडणवीसांची भेट
 
ते पुढे म्हणाले की, "काँग्रेस हा देशातील मोठा पक्ष आहे तर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष आहेत. त्यामुळे आम्ही काही राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड इथल्या जागा मागत नाहीत. प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यातल्या जागा मागतात. कारण त्यांचं अस्तित्व आणि त्यांचे कार्यकर्ते त्यावर अवलंबून असतात. आमच्यात तसे मतभेद नाहीत पण एखाद्या जागेवर दोन पक्षातील कार्यकर्ते दावा करतात. आम्ही कोल्हापूरची जागा हसत हसत सोडली. मग आम्ही सांगली लढवण्याचा निर्णय घेतला. यावर आता चर्चा होऊन मार्ग निघेल," असेही ते म्हणाले.