मुंबई : संजय राऊतांचं विधान हे विद्वेष पसरवणारं असून यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती. यावर आता शेलारांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आशिष शेलार यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "संजय राऊत यांनी केलेलं विधान हे पंतप्रधान मोदींची बदनामी करणारं आणि त्यांच्याबद्दल विद्वेष पसरवणारं आहे. त्यामुळे आम्ही याबद्दल निवडणूक आयोगाला दखल घेण्याची विनंती करुन यावर कायदेशीर कारवाईची अपेक्षा करु."
"उद्धवजी मुख्यमंत्री असताना याकूब मेमनचं थडगं सजवलं गेलं, याला औरंगजेबी मानसिकता म्हणणार की, नाही? संजय राऊत तर छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागत होते. त्यामुळे ही राऊतांची औरंगजेबी मनोवृत्ती नाही का? असे सवाल करत उद्धवजींनी याचं उत्तर द्यावं," अशी मागणी त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, "निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींबद्दल विद्वेश पसरवणाऱ्या वक्तव्यांबद्दल कारवाईची अपेक्षा आहे. संजय राऊत हे मोदीजींच्याच आशीर्वादाने खासदार झाले आहेत. उद्धवजींच्या अहंकारामुळे, छळवणूकीमुळे आणि परपक्षावर असलेल्या त्यांच्या प्रेमामुळे त्यांचे लोक त्यांना सोडून जात आहेत," असेही ते म्हणाले.