नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये साजिद नावाच्या न्हावीने दोन मुलांची वस्तरा वापरून निर्घृण हत्या केली. हत्येनंतर साजिदने मृतदेहाचे रक्तप्राशनही केले. दि. १९ मार्च रोजी झालेल्या हत्येच्या दिवशीच साजिद चकमकीत युपी पोलिसांकडून मारला गेला. दरम्यान, या हत्येत साजिदच्या कुटुंबीयांचा काही सहभाग होता का, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
युपी पोलिसांकडून एन्काऊंटरमध्ये मारला गेल्यानंतर त्यावर दावा करण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने साजिदचा मृतदेह अद्याप शवागारातच ठेवण्यात आला आहे. एसएसपी आलोक प्रियदर्शी म्हणाले की, साजिदने पीडित कुटुंबाच्या घरासमोर केशकर्तनालय थाटले असून तो पीडितांच्या घरीही जात असे. सायंकाळी ०७.३० वाजता लहान मुले गच्चीवर खेळत असताना तो घरात घुसला होता. हत्याकांडानंतर पोलिसांनी वेढा घातला तेव्हा त्याने गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.
आरोपी साजिदची आई नाजरीन यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत आपल्या मुलाच्या एन्काऊंटरवर भाष्य केले आहे. जुने वैर किंवा संघर्षाची चर्चाही त्यांनी फेटाळून लावली. दुसरा फरार मुलगा जावेद याच्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे नाजरीनचे म्हणणे आहे. त्या म्हणाल्या की, साजिदने काहीही केले, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले.