“मराठी कलाकारांना फिल्मफेअर देणं बंद केलं पण रितेशने...” उषा नाईक यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
02-Mar-2024
Total Views |
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी फिल्मफेअरच्या राजकारणाबद्दल भाष्य केले. मराठी कलाकारांना हा पुरस्कार देणं बंद केलं होतं पण रितेश देशमुख यांच्यामुळे पुन्हा कलाकारांना हा बहुमान मिळण्यास सुरुवात झाली असेही त्यांनी म्हटले.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत बॅक डान्सर म्हणून करत कालांतराने मराठी चित्रपटांचा एक सोज्वळ चेहरा झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे उषा नाईक. ७० च्या दशकापासून एकाहून एक दर्जेदार भूमिका प्रेक्षकांना बहाल करणाऱ्या उषा नाईक (Usha Naik) यांना नुकताच महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेले अनेक वर्ष चित्रपटसृष्टीला दिल्यानंतर मराठी कलाकारांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांबद्दल उषा नाईक (Usha Naik) यांनी महत्वाचे विधान केले आहे. उषा नाईक यांनी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत मराठी कलाकारांना माझ्यामुळे फिल्मफेअर देणं बंद केलं होतं आणि त्यानंतर ते कुणामुळे सुरु झालं याचा एक किस्सा सांगितला.
७०-८० च्या दशकात ज्या अभिनेत्री चित्रपटांत काम करत होत्या, त्या आपलं घर-संसार सांभाळून शुटिंग करत होत्या. बऱ्याचदा घर आणि शुटींगमध्ये अभिनेत्रींना घराची निवड करावी लागत होती, ज्यावेळी उषा नाईक यांनी घराचा आणि आपल्या मुलाचा सांभाळ करण्याला प्राधान्य दिलं होतं त्यावेळी त्यांना दुजाभावाचा सामना करावा लागला होता असेही उषा नाईक यांनी सांगितले. तसेच, यावेळी फिल्मफेअर पुरस्काराबद्दल बोलताना उषा नाईक म्हणाल्या, “ त्यावेळी मला फिल्मफेअर पुरस्कार जाहिर झाला होता, पण स्विकारण्यासाठी मी गेले नव्हते. कारण माझ्या मुलाची तब्येत ठिक नसल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु होते. ही धावपळ सोडून मी पुरस्कार घेण्यासाठी जाणं मला त्यावेळी अयोग्य वाटलं होतं.”
पुढे त्या म्हणाल्या, “त्यामुळे त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये मराठी कलाकारांना घेणं बंद केलं. आम्ही पुरस्कार देतो पण ही मराठी कलाकार मंडळी पुरस्कार घ्यायला येत नाहीत. यांना या पुरस्काराची काळजी नसेल तर जाऊदे.... असं देखील बोललं जायचं. तेव्हापासून मराठी कलाकारांना फिल्मफेअर पुरस्कार देणं त्यांनी बंद केलं होतं. पण पुन्हा हा फिल्मफेअर पुरस्कार देण्यास अभिनेता रितेश देशमुख यांनी स्वतंत्रपणे सुरुवात केली. तेव्हा मी या पुरस्कार सोहळ्याला गेले. त्यावेळी तिथेही मी हे बोलून दाखवलं की, हा फिल्मफेअर पुरस्कार मराठी कलाकारांसाठी माझ्यामुळे बंद झाला होता, तो पुन्हा एकदा रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांनी सुरु केला”, अशा शब्दांत त्यांनी रितेश देशमुख यांचे कौतुक करत आभार मानले होते.
बॅक डान्सर ते अभिनेत्री...
अभिनेत्री उषा नाईक यांनी बॅक डान्सर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठी चित्रपटांतून केली होती. मराठी चित्रपटसृष्टीचा प्राण म्हणजे लावणी आणि याच लावण्यवतींच्या मागे नृत्य करत होत्या. कालांतराने १९७४ साली ‘सामना’ या चित्रपटातून उषा नाईक यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. सोज्वळ आईची भूमिका असो किंवा मग खलनायिका असो त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केले. ‘संसार’, ‘हिरवं कुंकू’, ‘हळद तुझी कुंकू माझं’, ‘माफीचा साक्षीदार’, अशा अनेक चित्रपटांत आणि ‘स्वप्नांच्या पलिकडले’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘राणी मी होणार’, अशा अनेक मराठी मालिकांमध्येही त्यांनी कामं केली.