"अजित पवारांना आता माझा आवाका समजेल!" विजय शिवतारेंचा इशारा

    18-Mar-2024
Total Views |

Vijay Shivtare


मुंबई :
माझा आवाका सांगणाऱ्या अजित पवारांना आता माझा आवाका कळेल, असा इशारा शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारेंनी अजित पवार आणि शरद पवारांविरोधात दंड थोपटले असून बारामतीतून निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. यानिमित्ताने त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
विजय शिवतारे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला आपल्याला युतीधर्म पाळायला हवा, असे सांगितले. पण मी त्यांना सांगितलं की, विधानसभेच्या सगळ्याच मतदारसंघातील मतदारांची उत्सुकता वाढली आहे. कारण ४० वर्षापर्यंत पवारांना विरोध करण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. त्यामुळे सततच्या सत्तेमुळे त्यांच्यात अराजकता निर्माण झाली आहे. ही अराजकता मोडण्याची जनतेची ईच्छा आहे. त्यामुळे मला उभं राहणं गरजेचं असल्याचे मी त्यांना समजावून सांगितलं आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  हिंदुत्त्व सोडले नसाल तर 'या' प्रश्नांची उत्तरं द्या!, भाजपचा ठाकरेंवर प्रहार
 
"मी उभा राहणार नसलो तरी अजित पवार निवडून येणार नाहीत असंही मी मुख्यमंत्री शिंदेंना सांगितलं आहे. परंतू, त्यांनी मला युतीधर्म पाळायचा असल्याचे म्हटले. त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसांत याबाबत चर्चा करुन निर्णय घेणार आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "अजित पवार मला म्हणाले होते की, अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती? तु बोलतोस कोणाबद्दल? आता त्यांना माझा आवाका माहिती पडेल. मी एवढा लहान कार्यकर्ता आहे तर तुम्ही मला का घाबरता?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे सगळे प्रकल्प केवळ बारामतीमध्ये येतात. त्यामुळे तिथे असंतूलित विकास झाला आहे," असा आरोपही त्यांनी केला आहे.