मुंबई : रविवारी शिवाजी पार्कवर राहूल गांधींची सभा पार पडली. या सभेत उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरेदेखील सहभागी झाले होते. यावरून आता भाजपने उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारले असून हिंदुत्व सोडले नसेल तर या प्रश्नांची उत्तरं द्या, असे आव्हान दिले आहे.
भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये म्हटले की, "भाजपला हिंदुत्वावरून उपदेश करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. उद्धव ठाकरे इस्लामिक देशात होत असलेल्या छळाला कंटाळून भारतात आलेल्या निर्वासितांना नागरिकत्व देणाऱ्या CAA कायद्याला विरोध करणे बंद करणार का? राहूल गांधींना CAA कायद्याला समर्थन द्यायला लावणार का? राहूल गांधींनी वेळोवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला. याबद्दल उद्धव ठाकरे जाब विचारणार का? वीर सावरकारांची माफी सोडा पण त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी तरी व्यक्त करायला लावणार का?," असे सवाल या व्हिडीओच्या माध्यमातून भाजपने ठाकरेंना विचारले आहेत.
यात पुढे म्हटले की, "उद्धव ठाकरे तुम्ही हे कदापि करु शकणार नाही. कारण तुम्ही आता विशिष्ट मतपेढीच्या मागे लागले आहात. तुम्हाला जर खरंच बाळासाहेबांची ईच्छा पूर्ण करायची असेल तर त्यांची 'काँग्रेससोबत गेलो तर मी माझं दुकान बंद करेन' ही ईच्छा आधी पूर्ण करा आणि मग आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न बघा," असेही या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.