मुंबई : मी सोनिया गांधींना भेटलोच नाही. राहूल गांधींच्या विधानाला काहीही अर्थ नाही, असे स्पष्टीकरण खासदार अशोक चव्हाण यांनी दिले आहे. राहूल गांधींनी रविवारी मुंबईतील सभेत इथल्या एका वरिष्ठ नेत्याने काँग्रसला सोडल्यानंतर माझ्या आईजवळ आपली व्यथा मांडल्याचा दावा केला होता. यावर आता अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, "राहूल गांधींनी मुंबईतील सभेत जे विधान केलं त्यात कोणाचंही नाव घेतलं नाही. परंतू, ते जर माझ्याविषयी काही बोलत असले तर त्यांचं विधान चुकीचं असून ते खरं नाही. जोपर्यंत मी पक्षाचा राजीनामा दिला नव्हता तोपर्यंत पक्ष कार्यालयात बसून मी पक्षाचेच काम करत होतो."
"ज्या दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर काही क्षणात मी पक्षाचाही राजीनामा दिला होता. तोपर्यंत मी राजीनामा देणार आहे हे कुणालाच माहिती नव्हतं. मी सोनियाजींना भेटलोच नाही. ही गोष्ट खोटी आहे. त्यात काहीही तथ्य नाही. निवडणुकीच्या हिशोबाने केलेलं हे राजकीय वक्तव्य असून त्यात कोणतंही तथ्य नाही," असे ते म्हणाले.
राहूल गांधी काय म्हणाले?
"या राज्यातील एका वरिष्ठ नेत्याने काँग्रसला सोडलं आणि माझी आई सोनिया गांधींना रडत रडत सांगितलं की, सोनियाजी, मला लाज वाटत आहे. माझ्यात या शक्तीसोबत लढण्याची हिंमत नाही. मला तुरुंगात जायचे नाही," अशी व्यथा मांडली असल्याचे राहूल गांधींनी म्हटले होते.