भारत जोडो समारोप सभेला ठाकरेंना 'हिंदू' शब्द वापरण्यास बंदी?
18-Mar-2024
Total Views |
मुंबई : राहूल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेला उद्धव ठाकरेंना 'हिंदू' शब्द वापरण्यास बंदी घालण्यात आली होती का? असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. रविवारी झालेल्या राहूल गांधींच्या सभेतील उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून शेलारांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
आशिष शेलार यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंना अनेक सवाल केले आहेत. ते म्हणाले की, "आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन आपल्याला हवे तेवढे शिवतीर्थावर भाषण करणारे श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा "न्याय" मिळाला का? त्यांना भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का?," असा सवाल त्यांनी केला आहे.
तसेच "उद्धव ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो' अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकासमोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना "मर्दा"सारखे दोन खडे बोल ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का? हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने 'हिंदुत्वाला केले तडीपार' हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच शिवतीर्थावर सभा घेण्यात आली होती का?," असे प्रश्नही शेलारांनी विचारले आहेत.
आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन... आपल्याला हवे तेवढे... शिवतीर्थावर भाषण करणारे.. ◆श्रीमान उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा "न्याय" मिळाला ? ◆भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? ◆भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!”…
ते पुढे म्हणाले की, "सभा एक झाली पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेली. काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची 'मशाल' आता खंजीर, वाघ, मर्द, कोथळा अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल," असा खोचक टोलही आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.