माकडांच्या उपद्रवावर उपाय; कोकणातील माकडांचे होणार निर्बिजीकरण
16-Mar-2024
Total Views | 139
1
मुंबई (विशेष प्रतिनिधी): गेल्या काही वर्षापासून कोकणातील आंबा, काजू, सुपारी, नारळ, फणस तसेच इतर शेतीपिकांना होणारा माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला आहे. या उपद्रवाला आळा घालण्यासाठी आता कोकणातील माकडांचे निर्बिजीकरण (monkey sterilisation) करण्यात येणार आहे.
माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे शेतीपिकांवरील, फळबागांवरील माकडांचे उपद्व्याप वाढले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वानर आणि माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीची दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच कोकण कृषी विद्यापीठ आणि वनअधिकारी यांची एक समिती स्थापन केली गेली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये माकडांची संख्येमध्ये वाढ झाल्यानंतर त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून माकडांचे निर्बिजीकरण (monkey sterilisation) केले होते. यामुळे चांगले परिणाम दिसून आले असून त्या पार्श्वभूमीवर कोकणात ही हा उपक्रम राबविला जाऊ शकतो. समितीमध्ये मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली, कोल्हापूर प्रादेशिक मुख्य वनरक्षक आर. एस. रामानुजम कोकणातील आमदार डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषीविद्यापिठाचे प्राध्यापक, कृषी आयुक्त आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे प्रतिनिधी यांचा अभ्यासगट नियुक्त करण्यात आलाय.