चित्रपटांची पायरसी बंद झाल्यास मराठी चित्रपट नक्कीच चालतील – मनोज जोशी

    16-Mar-2024
Total Views |
हिंदी, मराठी, गुजराती नाटक, चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते मनोज जोशी यांचा ‘जन्म ऋण’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
 
 
manoj joshi
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : कांचन अधिकारी दिग्दर्शित आणि निर्मित ‘जन्म ऋण’ या चित्रपटातून बर्याच काळानंतर अभिनेते मनोज जोशी (Manoj Joshi) मराठी चित्रपटांत दिसणार आहेत. यापुर्वी ‘नारबाची वाडी’, ‘गोळाबेरीज’, ‘दशक्रिया’, या मराठी चित्रपटांत ते दिसले होते. ‘दै. मुंबई तरुण भारत’ सोबत बोलताना मनोज जोशी (Manoj Joshi) यांनी मराठी चित्रपट का चालत नाहीत? याची काही कारणं आणि त्यावरील उपाय देखील सांगितले. यात त्यांनी प्रामुख्याने ‘चित्रपटांची पायरसी बंद झाली पाहिजे’, यावर जोर दिला.
 
हे वाचलंत का? - ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश  
 
मराठी चित्रपट का चालत नाहीत, याबद्दल बोलताना जोशी म्हणाले, “मराठी चित्रपटांची एक महत्वाची खासियत म्हणजे त्यांची कथाच त्यांचा हिरो असतो. पण तरीही प्रेक्षक मराठी चित्रपट पाहात नाही अशी तक्रार केली जाते. याबद्दल मला असं वाटतं की, मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रपटगृहे जर का उभारली गेली, तसेच एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रिन थिएटर्सच्या पुर्नबांधणी आणि उभारणीसाठी आर्थिक मदत, कमी व्याजदरात कर्ज दिले तर केवळ मराठी चित्रपटांसाठी राखीव चित्रपटगृहे असतील आणि त्यावेळी नक्कीच प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे वळतील”, अशी खात्री जोशी यांनी व्यक्त केली.
 
तसेच, मोकळ्या जागेत बलून थिएटर्स मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत उभारल्यास त्याचाही फायदा होईल असे मत जोशी यांनी मांडले. दुसरी महत्वाची बाब म्हणजे हिंदीपेक्षा कमी बजेटमध्ये विषय उत्तमरित्या हाताळण्याची कसब मराठी चित्रपटसृष्टीतील मेकर्सकडे असल्याचेही ते म्हणाले. मराठी चित्रपट न चालण्याचे आणखी एक महत्वाचे कारण सांगताना जोशी म्हणाले की, “चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पायरेटेड चित्रपट व्हॉट्सअप किंवा अन्य सोशल मिडिया साईट्सवर उपलब्ध होतात किंवा काही दिवसांनी तो ओटीटीवर प्रदर्शित होता तिथे तो पाहिला जातो. परिणामी प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत पोहोचत नाही आणि निर्मात्यांच्या खिशाला कात्री बसते. त्यामुळे पायरसी थांबली पाहिजे असे मत जोशी यांनी ठामपणे मांडले.