मुंबई : महाविकास आघाडीमध्ये मोठा गँगवॉर सुरु आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत खोटं बोलत असल्याचे म्हटले होते. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊत आणि राहुल गांधींवरही टीका केली. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे म्हणाले की, "काही महिन्यापासून मी जे काही बोलतोय तेच प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आहे. संजय राऊत हे कॅमेरासमोर खोटं बोलतात, खोटी माहिती देतात आणि खोटा आव आणतात. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची आतमध्ये जी परिस्थिती आहे त्यात मोठा गँगवॉर सुरु आहे. एकमेकांवर बंदुका काढण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे. म्हणजेच महाविकास आघाडी व्हेंटिलेटरवर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही."
"संजय राऊत हे बाहेर पत्रकार परिषदेत बोलत असताना आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही मान देतो, असं सांगतात. पण आता प्रकाश आंबेडकरांनी स्वत:च्या तोंडाने स्पष्ट केलंय की, भांडुपचा शकुनी मामा कुणाचाच नसून खोटं बोलणारा आहे," असे ते म्हणाले.
राहूल गांधींचा पायगुण!
नितेश राणे पुढे म्हणाले की, "राहुल गांधींचा पायगुण खुप चांगला आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून त्यांनी ज्या ज्या राज्यात पाऊल ठेवलं आहे तिथे तिथे एकतर त्यांचा मित्रपक्ष त्यांना सोडून गेला आहे किंवा काँग्रेसमधून कुणीतरी फुटलं आहे. आता त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता एकतर महाविकास आघाडीला भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल किंवा काँग्रेसमध्ये भुकंप होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी हे संपलेलं दुकान आहे. त्यांच्या बैठकांना काहीही अर्थ राहिलेला नाही," असेही ते म्हणाले.