१ कोटी घरांच्या छतावर लागणार सौर पॅनल! काय आहे, पीएम सूर्य घर योजना?
29-Feb-2024
Total Views |
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने या योजनेला मंजूरी दिली आहे.
या योजनेअंतर्गत भारत सरकार ७५ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे. याअंतर्गत १ कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत. पंतप्रधान सूर्य घर योजनेंतर्गत एक कोटी घरांना ३०० युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत, २ किलोवॅट सिस्टीमच्या निवासी रूफटॉप सोलरसाठी एकूण प्रणाली खर्चाच्या ६० टक्के केंद्रीय आर्थिक सहाय्य देखील प्रदान केले जाईल.
२ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीचा ४० टक्के खर्च सरकार उचलणार आहे. सरकार एक किलोवॅट प्रणालीवर ३०,००० रुपये, २ किलोवॅट प्रणालीवर ६०,००० रुपये आणि ३ किलोवॅट प्रणालीवर ७८,००० रुपयांपर्यंत अनुदान देईल. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेद्वारे, कुटुंबे वीज बिल वाचवू शकतील आणि डिस्कॉम्सला अतिरिक्त वीज विकून पैसे कमवू शकतील.
३ किलोवॅट रुफटॉप सोलर सिस्टीमद्वारे सरासरी ३०० युनिट वीज निर्मिती करता येते. या योजनेद्वारे, निवासी क्षेत्रात ३० जीडब्लू सौर क्षमता निर्माण केली जाईल, २५ वर्षांमध्ये रूफटॉप सोलर सिस्टीममुळे ७२० दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. सरकारने सांगितले की पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेद्वारे उत्पादन, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, विक्री, स्थापना आणि इतर सेवांमध्ये १७ लाख थेट नोकऱ्या निर्माण केल्या जाऊ शकतात.