युक्रेन युद्धात रशियाकडे झुकते पारडे...

    27-Feb-2024   
Total Views |
russia ukraine conflict

युक्रेनमधील युद्धाला दोन वर्ष नुकतीच पूर्ण झाली असून रशियाचे पारडे पुन्हा एकदा जड होताना दिसते. युरोप आणि अमेरिकेचा युक्रेनला पाठिंबा असला तरी त्यांच्याकडून होणारा शस्त्रास्त्रं आणि आर्थिक पुरवठ्याचा ओघ आटला आहे. त्यातच या वर्षी अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये निवडणुका होणार असून, जर युरोप आणि अमेरिकेत युद्धविरोधी नेते आणि पक्षांचा विजय झाला, तर २०२५ साली लढणार कसे, हा प्रश्न युक्रेनला भेडसावू लागला आहे.

दि.२४ फेब्रुवारी, २०२२ रोजी रशियन फौजांनी युक्रेनवर चहूबाजूंनी हल्ला चढवून त्याचा सुमारे २० टक्के भूभाग बळकावला. रशियाने २०१४ सालीच युक्रेनकडून काळ्या समुद्राच्या किनार्‍यावरील क्रीमिया प्रांत ताब्यात घेतला होता. या युद्धाच्या सुरुवातीला युक्रेनमधील डिनिपर नदीच्या पूर्वेकडील डोनेस्क आणि लुहान्स भाग ताब्यात घेऊन रशियाने क्रीमियाला आपल्या भूभागाद्वारे जोडले. सुरुवातीला माघार घेतल्यानंतर या युद्धामध्ये युक्रेनने गनिमी काव्याचा वापर करून रशियाचे मोठे नुकसान केले. आजवर वेगवेगळ्या अंदाजांनुसार, रशियाचे सुमारे ७० हजार ते ८८ हजार सैनिक मारले गेले असून, मृत किंवा जखमी झालेल्या सैनिकांची संख्या तीन लाखांवर आहे. या युद्धामध्ये युक्रेननेही सुमारे ७० हजार सैनिक आणि दहा हजार नागरिक गमावले आहेत. असे असूनही हे युद्ध संपण्याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. आजही ९२ टक्के युक्रेनियन लोकांना वाटते की, जोपर्यंत युक्रेन क्रीमियासह आपला गमावलेला सर्वच्या सर्व भूभाग परत मिळवत नाही, तोपर्यंत हे युद्ध चालू राहायला हवे. आता युक्रेनच्या राजकारणात असलेले अंतर्विरोध उफाळून बाहेर येऊ लागले आहेत.

दि. ८ फेब्रुवारी रोजी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सैन्यप्रमुख वोल्दिमीर झालुझ्नी यांच्या जागी अ‍ॅलेक्झांडर सिरस्की यांची नेमणूक केली. झेलुझ्नी युक्रेनच्या जनतेमध्ये लोकप्रिय होते. २०१४ साली रशियाने क्रीमियाचा लचका तोडला तेव्हा युक्रेनने त्याविरूद्ध संघर्ष केला नव्हता. त्यामुळे हे युद्ध सुरू झाले तेव्हा झेलेन्स्कींच्या क्षमतेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. युक्रेनचे अध्यक्ष होण्यापूर्वी झेलेन्स्की अभिनेते होते. त्यांना प्रशासनाचा किंवा युद्धाचा कोणताही अनुभव नव्हता. युक्रेनच्या समाजातही युक्रेनियन भाषिक आणि रशियन भाषिक समाजांमध्ये मोठी दरी असल्यामुळे, २०१४ सालप्रमाणे यावेळेसही युक्रेन न लढताच सपशेल शरणागती पत्करेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात झेलेन्स्की यांनी युक्रेनचे नेतृत्त्व करण्याची क्षमता दाखवली. युद्धाच्या मैदानात झालुझ्नी यांनी जे कौशल्य दाखवले, त्याची जगभर प्रशंसा करण्यात आली.

युक्रेन १९९०च्या दशकापूर्वी रशियाचा भाग असल्यामुळे युक्रेनची जवळपास सर्व शस्त्रास्त्रं, सैनिकांचे प्रशिक्षण आणि युद्धनीती यावर रशियाचा प्रभाव होता. स्वातंत्र्यानंतर युक्रेनने स्वतःकडची अण्वस्त्रे रशियाला दिली होती. या युद्धामध्ये वोल्दिमीर झालुझ्नी यांच्या नेतृत्त्वाखाली युक्रेनच्या सैन्याने रशियाला प्रचंड मोठा धक्का दिला. युक्रेनच्या नेमबाजांनी तसेच ड्रोननी युक्रेनची राजधानी कीव्हकडे कूच करणार्‍या रशियन सैन्यावर दबा धरून हल्ले केले आणि त्यांना माघार घ्यायला भाग पाडण्यात आले. रशियाचे आक्रमण युक्रेनच्या पूर्व भागापुरते मर्यादित राहिले. रशियाला थोपवल्यानंतर ज्या प्रकारे युक्रेनने प्रतिआक्रमण केले ते पाहता, अमेरिका आणि युरोपकडून शस्त्रास्त्रांची मदत मिळाल्यास अल्पावधीतच युक्रेन आपला सर्व भूभाग परत मिळवू शकेल, अशी शक्यता दिसू लागली. पण, रशियाने युद्धतंत्र बदलले आणि युद्धाचे पारडे फिरायला सुरुवात झाली. रशियाने आक्रमणाच्या ऐवजी सर्वत्र भूसुरुंगांची पेरणी करून पहिल्या महायुद्धाप्रमाणे खंदकांतील लढाईला सुरुवात केली. पाश्चिमात्य देशांनी टाकलेले कडक निर्बंध रशियाला रोखण्यात सपशेल अपयशी ठरले. चीन, भारत आणि ब्राझीलसारख्या देशांनी रशियाकडून स्वस्त दरात खनिज तेल आयात करणे सुरू ठेवले. इराणने रशियाला ड्रोनसह शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला, तर चीनने अत्याधुनिक तंत्रज्ञान रशियाला पुरवले. त्यामुळे निर्बंधांतही रशियन अर्थव्यवस्था वेगाने वाढली.

रशियामध्ये लोकशाही नसल्यामुळे लोकांना काय वाटते, हे महत्त्वाचे नाही. दि. ७ मे, २००० पासून रशियाचे अध्यक्ष म्हणून आणि २००८-२०१२ पर्यंत पंतप्रधान या नात्याने रशियाची सत्ता पुतीन यांच्याच हातात राहिली. त्यानंतर ते पुन्हा रशियाचे अध्यक्ष झाले. त्यांची सध्याची टर्म २०२४ मध्ये संपत असून त्यानंतरही सहा वर्षांच्या आणखी दोन टर्म सत्तेवर राहण्याचा मार्ग त्यांनी घटनादुरूस्तीद्वारे मोकळा केला होता, असे झाल्यास पुतीन रशियावर सुमारे २५ वर्षं राज्य करणार्‍या स्टॅलिनला मागे टाकतील. युक्रेनवरील आक्रमणाचा जुगार पुतीन का खेळले, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर शीतयुद्धाचा धोका टळला होता. त्यामुळे ‘नाटो’सारख्या संस्थांच्या अस्तित्त्वाला फारसा अर्थ उरला नव्हता.

आता ‘नाटो’चा गाशा गुंडाळण्यात यावा आणि सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या तसेच पूर्व युरोपातील रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या देशांच्या कारभारात युरोप आणि अमेरिकेने नाक खुपसू नये, अशी रशियाची अपेक्षा होती. पण, तेव्हा अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेण्याची रशियाकडे ताकद नव्हती. अमेरिका आणि युरोपने आपला विस्तारवाद चालू ठेवत रशियाच्या प्रभावाखालील देशांना ‘नाटो’चे सदस्य करण्याचा चंग बांधला. अशा परिस्थितीत व्लादिमीर पुतीन रशियाचे अध्यक्ष झाले. अल्पावधीतच त्यांनी रशियावर आपली पकड बसवली. पुतीन यांच्यासाठी हे युद्ध बचावात्मक असले, तरी संपूर्ण पाश्चिमात्य जगात पुतीन यांची प्रतिमा एक विस्तारवादी हुकूमशहा अशीच झाली आहे. ज्या प्रकारे पुतीन यांनी आपले विरोधक अ‍ॅलेक्सी नवलनी यांना सैबेरियातील तुरुंगामध्ये संपवले, ते पाहता पुतीन यांची रशियातील सत्तेवर असलेली पकड अधिक मजबूत झाल्यासारखी वाटत आहे.

पुतीन यांच्यासाठी हे युद्ध लांबवणे, हा एका रणनीतीचा भाग आहे. अमेरिकेची इराक आणि अफगाणिस्तानमधील अवस्था पाहून त्यांना खात्री आहे की, आज ना उद्या अमेरिका आणि युरोपला युक्रेनमधील युद्धाचा शीण येऊन ते आपला पाठिंबा काढतील. अमेरिकेत सध्या अध्यक्षपदासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्या-राज्यांमध्ये निवडणुका सुरू असून नुकत्याच साऊथ कॅरोलिना या राज्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी निकी हेली यांचा दणदणीत पराभव केला. साऊथ कॅरोलिना हे हेलींचे गृहराज्य असून, पूर्वी सहा वर्षं त्या या राज्याच्या गव्हर्नरपदी होत्या. या विजयाचा अर्थ असा निघतो की, जर न्यायालयाने ट्रम्प यांना थांबवले नाही, तर डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्यासाठी अमेरिकेची अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असून ‘नाटो’ सदस्य देश आपल्या संरक्षणावरील खर्च वाढवत नसतील, तर अमेरिका त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार नाही.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यास रशियासाठी हे युद्ध सोपे जाणार आहे. त्यातून रशिया या युद्धाच्या सुरुवातीला जिंकलेला, पण नंतर गमावलेला आणखी काही भूभाग परत मिळवू शकेल. पण, युक्रेनचा सपशेल पराभव करणे, तिथे रशिया समर्थक अध्यक्ष नेमणे आणि त्यांच्याकडून युद्धखर्च वसूल करणे रशियाच्या आवाक्याबाहेर आहे. रशियाने भूभाग मिळवला असला तरी पुढची अनेक वर्षं रशियाला आंतरराष्ट्रीय निर्बंध सहन करावे लागतील. युक्रेनने या युद्धात ड्रोनचे युद्धतंत्र चांगलेच विकसित केले असून, रशियाच्या अंतर्गत भागात ५०० किमीपेक्षाही पुढच्या भागात हल्ले करणे त्यांना शक्य झाले आहे. त्यामुळे रशियालाही स्थैर्य आणि सुबत्तेची अपेक्षा करता येणार नाही. पुन्हा एकदा बलशाली देश होण्याचे रशियाचे स्वप्न आता उद्ध्वस्त झाले आहे. युक्रेनमधील युद्धात पुढील वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.