मुंबई तरूण भारत विशेष: सेबीच्या चौकशीत ए आय प्रवेश ही घोटाळेबाजांसाठी धोक्याची घंटा

    24-Feb-2024
Total Views |

sebi
 
 
मुंबई तरूण भारत विशेष: सेबीच्या चौकशीत एआय प्रवेश ही घोटाळेबाजांसाठी धोक्याची घंटा
 

मोहित सोमण
 
तेराव्या इंटरनॅशनल कन्व्हेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॅशनल एक्सचेंज मेंबर ऑफ इंडियामध्ये सेबीचे अधिकारी कमलेश चंद्र वर्शनी यांनी बोलताना सेबीकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू करण्यात आल्याचा दुजोरा प्रसारमाध्यमांना दिला आहे. याप्रसंगी बोलताना आर्थिक गैरव्यवहार,घोटाळे,आर्थिक अनियमितता आढळल्यास यावर सेबी ए आय माध्यमातून माहिती मिळवणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. एआयचा वाढता वापर व उपयुक्तता लक्षात घेता आर्थिक व्यवस्थापनात ए आयचा शिरकाव याबद्दलची नांदी आहे.
 
फायनांशियल सेवा, टेक्नॉलॉजी यांचा संबंध तसा जुनाच आहे. काळानुरूप हातातील ' चोपड्याची जागा संगणकाने घेतली. चुटकीसरशी गणिते संगणक सोडवू लागला. यामुळे आर्थिक व्यवहारात अचूकता येऊन भलामोठा वेळ वाचू लागला. किचकट गणिताची सांगड घालण्याची अकाउंटिंग प्रोग्रामिंग कामी आले. बाजारात आता ब्लॉकचेन व ए आय यांचा प्रवेश झाल्यामुळे ' डेटा' वरील भर वाढला आहे. विविध माहिती जमा करत त्यावर काम करत करणारी ब्लॉकचेन वेगात विकसित होत आहे. औद्योगिक, बीएफएसआय, वैद्यकीय, तंत्रज्ञान, सेवा अशा अनेक क्षेत्रांत ही क्रांती होत असताना, जनरेटिव एआयचा वापर वाढल्याने प्रश्नांच्या मूळाशी जाणे शास्त्रोक्त पद्धतीने शक्य झाले आहे.
 
१९९० च्या आधी सेबीचा (सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) चा जन्म झाला तरी खरोखर अर्थाने १९९२ हर्षद मेहता घोटाळ्यानंतर पडद्यावर आला. आर्थिक गफलेबाजीने नव्वदच्या दशकात जोर पकडल्यानंतर कायद्यातून पळवाट शोधणारी 'व्यक्तिमत्वे ' जन्माला आली. सेबीची जबाबदार वाढल्यानंतर अनेक सकारात्मक बदल घडले. सेबीचा एक वचक बसला. इनसआयडर ट्रेडिंग काही प्रमाणात आजही होत असले तरी मोठ्या प्रमाणात त्याला आळा बसला. घोटाळा, गैरव्यवहार, टॅक्स चोरी, मनी लॉन्ड्रिंगचा अनेक गुन्ह्यांमध्ये सेबीने महत्वाची भूमिका बजावली आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सेबी उतरत असल्याने घोटाळेबाजांसाठी ही धोक्याची घंटा आहे.
 
शेअर बाजारात छोट्या गुंतवणूकदारांच्या हिताची जपणूक करण्यासाठी ' इन्व्हेसटर प्रोटेक्शन व एज्युकेशन कायद्याअंतर्गत गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला. मनी लॉन्ड्रिंगचा कडक कायदा आल्यावर ' हेराफेरी ' वर आळा बसला. गुंतवणूक शेअर बाजारात गुंतवणूक करताना आपली पूंजी अर्पण करतात. त्याच्या मोहापायी चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केल्यास मोठा फटका गुंतवणूकदारांना होतो मात्र त्यासाठी वेळोवेळी सेबीने मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत.
 
सेबीने हे लागू करतानाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशिन लर्निगचा विकास करण्यासाठी रोबो अँडव्हायझर मध्ये २०१९ साली सेबीने याबाबत अभ्यास सुरू केला होता. विविध आर्थिक उत्पादन खरेदी करताना गुंतवणूकदार आपली माहिती कंपन्यांना पुरवतात. या माहितीच्या आधारे कंपन्यांही व्यवहार करतात. त्याच्या मुळाशी जाण्यासाठी सेबी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार आहे. विशेषतः म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी सेबी एआयचा वापर करत असल्याची प्रतिक्रिया सेबीच्या अध्यक्ष मधाबी पुरी बूज यांनी दिली होती.
 
यासाठी सेबी अलगोरिदम विकसित करत आहेत. यामुळे म्युच्युअल फंडामधील फसव्या जाहिराती, दावे, गैरव्यवहार रोखण्यास या अलगोलिदमची मदत होणार आहे. उदाहरणार्थ मयत व्यक्तीच्या नावे म्युच्युअल फंडचे व्यवहार सुरु असल्यास किंवा अनेक वर्षापुर्वी बंद पडलेला म्युच्युअल फंड जिवीत व्यक्तीच्या नावाने सुरू होणे किंवा अशा प्रकारच्या विविध घटना आता सेबी ट्रॅक करू शकणार आहे.
 
व्होल्टेटाईल मार्केटमध्ये व्यवहारांची संख्या मोठी कसली तरी सेबीच्या रडारवर संदिग्ध खाती येण्याची शक्यता वाढली आहे. सेबीच्या अधिकारींचे नवीन विधान नक्कीच गुंतवणूकीचे कडक संकेत देत आहेत. त्यामुळे गैरव्यवहार करणाऱ्या लोकांना किंवा फंड मॅनेजरसाठी इतना इशारा काफी आहे.