दुसरा टप्पा विझलाच!

    02-Feb-2024   
Total Views |

rahul gandhi
 
महाराष्ट्रात उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा)च्या साथीने जोर दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असू शकतो. मात्र, राज्यातील या तिन्ही पक्षांची सद्यःस्थिती लक्षात घेता, येथेही काँग्रेसच्या हाती शून्यच येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे एकूणच राहुल गांधींच्या यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याची वात पेटण्याआधीच विझली असल्याचे दिसते.
 
आम्हाला सांगितले जात आहे की, प्रवास थांबवा, एक किंवा दोन वाहनांनी जा, हे कसे शक्य आहे? मी प्रशासनाला सांगेन की, राहुल गांधींना बंगालमध्ये फक्त दोन ते चार तास राहायचे आहे. नंतर तुमची इच्छा असेल तसे करा. मात्र, आम्हाला आणि राहुल गांधींना किमान झारखंड सीमेपर्यंत तरी जाऊ द्या,” अशा शब्दांत काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते आणि पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी हे शुक्रवारी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आर्जव करत होते. निमित्त होते, ते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चे.
 
झाले असे की, राहुल गांधी यांची ही यात्रा सध्या प. बंगालमधून जात आहे. मात्र, या यात्रेची हवा काढण्याचा निर्णय कदाचित ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसने घेतला असावा. प. बंगालमध्ये सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे राहुल गांधी यांच्या या यात्रेमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने, त्यांनी केवळ एक ते दोन गाड्या वापरून यात्रा करावी; असे आदेश त्यांना देण्यात आले. त्यामुळे अगदीच घायकुतीला आलेल्या, अधीररंजन चौधरी यांनी ममता सरकारला अशी विनंती केली. “शाळेत परीक्षेसाठी जाणार्‍या मुलांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. विद्यार्थी तर सकाळी ८.३० वाजता शाळेत पोहोचले आहेत, त्यांची परीक्षा सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत पार पडणार आहे. राहुल गांधी अतिशय शांततेत रस्त्यावरील लोकांना हात हलवत जाणार आहेत,” असाही तर्क अधीररंजन यांनी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, झारखंडमध्ये प्रवेश करण्यासाठी, तृणमूल सरकारने राहुल गांधी यांना यात्रेतील सर्वच्या सर्वच गाड्या घेऊन, जाण्यास परवानगी दिलीच नाही.
 
यापूर्वी ’भारत जोडो न्याय यात्रे’मुळे आसामची राजधानी गुवाहाटीमध्येही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी त्याची दखल घेऊन, राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनास दिले. त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली की, राहुल गांधी यांना अटकही होईल, असेही ते म्हणाले आहेत. अर्थात, आसाममध्ये राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक राडेबाजी केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. हिमंता बिस्व सरमा यांचे गांधी कुटुंबावर आरोप करून, काँग्रेस पक्ष सोडणे, हे राहुल गांधी यांच्या जिव्हारी लागले असल्याचेच, याद्वारे स्पष्ट होत असल्याचे म्हणता येईल.
 
अर्थात, बंगालमध्ये असा राडा करण्याची किंवा थेट ममता बॅनर्जी यांना लक्ष्य करण्याची हिंमत काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनी दाखवलेली नाही. अर्थात, यामागे ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसप्रणित ’इंडिया’ आघाडीस लावलेली चूड कारणीभूत असण्याची शक्यताच जास्त. ममता बॅनर्जी यांनी केवळ काँग्रेसच नव्हे, तर आघाडीतील डाव्या पक्षांनाही त्यांची जागा दाखवून दिली आहे. बंगालमध्ये प्रबळ असलेल्या ममता बॅनर्जी या राज्यात काँग्रेस किंवा अन्य डाव्या पक्षांना वाव देण्याची शक्यता कमीच होती.
 
त्यामुळे ‘भारत जोडो न्याय यात्रे’चेही बंगालमध्ये अतिशय थंड स्वागत करण्यात आले. त्यानंतर आता झारखंडमध्येही राजकीय अस्थिरता असल्याने, तेथेही राहुल गांधी यांचे फार जोरदार स्वागत होण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता थेट महाराष्ट्रात यात्रेचा जोरदार समारोप करायचा, असा विचार काँग्रेसकडून केला जात आहे. महाराष्ट्रात उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटा)च्या साथीने जोर दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असू शकतो. मात्र, राज्यातील या तिन्ही पक्षांची सद्यःस्थिती लक्षात घेता, येथेही काँग्रेसच्या हाती शून्यच येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे एकूणच राहुल गांधींच्या यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याची वात पेटण्याआधीच विझली असल्याचे दिसते.
 
काँग्रेसप्रणित ’इंडिया’ आघाडीची गाडी अजूनही जागावाटपावरच अडकली आहे. जागावाटप ही काही फार महत्त्वाची अथवा अडचणीची गोष्ट नाही, असे उसने अवसान काँग्रेसकडून आणले जात आहे. मात्र, हा मुद्दा आता अडचणीचा ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
तिकडे उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील १६ उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. सपने अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना मैनपुरीमधून उमेदवारी दिली आहे. अखिलेश यादव यांच्या कुटुंबासह ‘पीडीए’ची झलक सपच्या यादीत स्पष्टपणे दिसते. लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष नव्या पद्धतीने केडर मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाने ’पीडीए’ म्हणजेच ‘पिछडे, दलित आणि अल्पसंख्याकां’ना पाठिंबा देण्यासाठी योजना तयार केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अखिलेश यादव रोज आपल्या सभा आणि सभांमध्ये २०२४ मध्ये फक्त ‘पीडीए’च भाजपला हरवतील, असा उल्लेख करताना दिसत आहेत. राज्यातील सर्वाधिक १९ टक्के मुस्लीम लोकसंख्येचा कल सप आणि बसप यांच्यात कमी-जास्त प्रमाणात असल्याचे दिसते.
 
ही एकेकाळी काँग्रेसची कोअर व्होटबँक होती; मात्र मुलायमसिंह यादव आणि मायावती यांनी आपल्या राजकीय डावपेचांनी ती नष्ट केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा समाज आपल्या पक्षाकडे झुकत असल्याचा दावा अखिलेश यादव करत आहेत. सप प्रमुखांचा असा विश्वास आहे की, यादवांव्यतिरिक्त २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपकडे गेलेल्या इतर मागास जातीदेखील त्यांच्याकडे आल्याचा दावा अखिलेश यादव करत आहेत.
 
मात्र, यावर काँग्रेसचे समाधान झालेले दिसत नाही. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे म्हणतात की, “आघाडी यशस्वी करण्यासाठी काँग्रेस आपले १०० टक्के योगदान देत आहे; परंतु जर कोणताही छुपा अजेंडा दिसत असेल आणि सप त्या दिशेने काम करत असेल, तर काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असल्याने, तसे ते होऊ देणार नाही. काँग्रेसला केवळ ११ जागाच देण्याची तयारी अखिलेश यादव यांनी प्रारंभी दाखविली होती. मात्र, काँग्रेस नेतृत्वासोबतच्या चर्चेनंतर ११ वरून १३ जागा देऊ, असे अखिलेश यांनी म्हटले आहे. मात्र, लोकसभेचा राजमार्ग असलेल्या उत्तर प्रदेशात केवळ १३ जागांवर लढणे, हे खरे तर काँग्रेससाठी अतिशय अपमानास्पद आहे. त्यातच जर यावेळी भाजपने आपल्या रणनीतीद्वारे अमेठीप्रमाणेच रायबरेली लोकसभा मतदारसंघासही सुरूंग लावल्यास, काँग्रेससाठी हे जबरदस्त अपमानास्पद ठरणार आहे.”
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.