कोलकाता संग्रहालय : वय वर्षे २१०

Total Views |
indian museum
 
कोलकाता शहरातल्या जुन्या पार्क स्ट्रीटवर म्हणजे आताच्या नेहरू रोडवर ‘इंडियन म्युझियम’ या नावाने ओळखली जाणारी, एक भव्य वास्तू उभी आहे. आपल्या देशाच्या आधुनिक इतिहासातलं हे पहिलं म्युझियम किंवा संग्रहालय. दि. २ फेब्रुवारी १८१४ या दिवशी हे संग्रहालय अधिकृतपणे सुरू झालं. म्हणजे आज या संग्रहालयाला २१० वर्षं झाली. त्यानिमित्ताने...

कोलकात्याच्या या भव्य संग्रहालयात कला, पुरातत्त्व, मानववंशशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिविज्ञानशास्त्र आणि आर्थिक वनस्पतीशास्त्र असे सहा मुख्य विभाग असून, यांची एकूण ३५ दालने आहेत. एकंदर २० लाखांहून अधिक वस्तू किंवा नमुने इथे प्रदर्शित करण्यात आले आहेत. आज जगभरात जी जुन्यात जुनी संग्रहालयं अस्तित्वात आहेत, त्यात या संग्रहालयाचा क्रमांक नववा आहे. इथे हे नमूद करायला हवं की, जुन्यात जुन्या संग्रहालयांमध्ये पहिला क्रमांक आहे-कॅपटोलियन म्युझियमचा. इटली देशाची राजधानी रोम शहरातलं हे संग्रहालय १४७१ पासून अस्तित्वात आहे. कला आणि पुरातत्त्व संबंधित हजारो अनमोल वस्तूंनी हे संग्रहालय अगदी खच्चून भरलेले आहे.
 
ही माहिती कळल्यावर साहजिकच आपल्याला असं वाटतं की, इतर अनेक आधुनिक गोष्टींप्रमाणे संग्रहालय हीदेखील युरोपीय संकल्पना असावी. यातला थोडा भाग खरा आहे आणि थोडा चुकीचा आहे. म्हणजे काय? 
महाभारत काळात युधिष्ठिराने केलेल्या राजसूय यज्ञात विविध देशांच्या राजांनी युधिष्ठिराला अर्पण केलेल्या नजराण्यांचं, भेटवस्तूंचं वर्णन येतं. असंख्य प्रकारची रत्नं, मौल्यवान वस्तू तर त्यात आहेतच; पण विविध वस्त्रांचीही वर्णनं आहेत. उदा. कांबोज देशाच्या राजाने त्यांच्या देशातल्या मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवल्या जाणार्‍या अतिशय चमकदार रंगाच्या घोंगड्या युधिष्ठिराला दिल्या. एक राजा आपल्या सम्राटाला घोंगडी हा वस्त्रप्रकार नजराणा म्हणून देतो, यावरून त्या घोंगडीचा रंग, पोत, वीण इत्यादी काय दर्जाची असेल, याची आपण कल्पनाच करायची.
 
कौटिलीय अर्थशास्त्रामध्ये आर्य चाणक्याने मुळी कोषाध्यक्षाचं संपूर्ण कार्यचं तपशीलवार दिलं आहे. यात रत्नांचे असंख्य प्रकार दिलेले असून, कोषाध्यक्षाने राजाच्या खजिन्यात कोणती रत्ने ठेवावीत आणि कोणती ठेवू नयेत, हे देखील सांगितलं आहे. राज्याभिषेक प्रसंगी इंग्रजांतर्फे हेन्री ऑक्झेंडनने छत्रपती शिवरायांना एकूण साडेसोळाशे रुपयांचा नजराणा दिला. यात एक मौल्यवान अंगठी आणि एक सुंदर खुर्ची होती. खुर्ची हा आसन प्रकार तत्कालीन भारतात फारसा रूढ नव्हता. बादशाही दरबारांमध्ये स्वतः बादशहा तख्तावर बसे आणि समोर सर्व सरदार उभे राहत. महाराजांच्या राजसभेत स्वतः महाराज सिंहासनावर बसत आणि समोरचे सरदार बिछायतीवर मांडी घालून बसत. सदरेवर म्हणजे कार्यालयात महाराज किंचित उंच बनवलेल्या आसनावर लोडाला टेकून बसत. अशा आसनाला म्हणायचे ’मसनद.’ सरदार मंडळी बिछायतीवर बसत. त्यामुळे खुर्चीचं जरा अप्रूप होतं.
 
पुढे छत्रपती शाहू महाराजांना मौल्यवान वस्तू संग्रहित करून ठेवण्याबरोबरच विविध प्राणी पाळण्याचाही छंद होता. थोडक्यात त्यांचं स्वतःचं खासगी प्राणिसंग्रहालय होतं. त्याकाळी त्याला म्हणायचे ’शिकारखाना.’ शाहू छत्रपतींच्या पेशव्यांसकट सर्वच सरदारांना असा मौल्यवान वस्तूंचा, पुस्तकांचा, हत्यारांचा संग्रह करण्याचा छंद होता. उदा. बडोद्याचे गायकवाड सरदार घ्या. सरदार पिलाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे मूळ संस्थापक. पण, साधारणपणे गायकवाडी अंमल बडोद्यासह गुजरातवर पक्का झाला, तो पिलाजीराव यांचे चिरंजीव दमाजीराव यांच्या काळात. म्हणजे सन १७३४ पासून पुढे. सगळ्या गायकवाडांना उत्तमोत्तम कलावस्तूंइतकाच उत्तमोत्तम हत्यारं जमवण्याचाही छंद होता. बडोद्याच्या या हत्यारखान्यात एकंदर १ हजार, २०० तलवारी होत्या. जॉन गुंथर हे नाव तुम्ही ऐकलं किंवा वाचलं आहे का? विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातला हा एक फारच ख्यातकीर्त अमेरिकन प्रवासवर्णन लेखक होता. ’इनसाईड एशिया’, ’इनसाईड युरोप’ व ’इनसाईड रशिया’ अशी याची प्रवासवर्णनं. त्यावेळी तर प्रचंड लोकप्रिय झालीच. पण, आजही ती संदर्भ म्हणून अभ्यासली जातात, तर हा जॉन गुंथर १९३९ साली बडोद्याला आला होता, त्याने गायकवाडांच्या या हत्यारखान्यातल्या फक्त एकाच तलवारीची किंमत सुमारे अडीच लाख पौंड ठरवली होती. पुढे १९४१ साली बडोद्याचे सुप्रसिद्ध व्यायामतज्ज्ञ राजरत्न माणिकराव यांनी या संपूर्ण शस्त्रागाराचं काटेकोर सर्वेक्षण करून, प्रत्येक हत्याराची साद्यंत माहिती नोंदवून ठेवली. मात्र, कोणत्याच हत्याराचं मूल्य ठरवणं, माणिकरावांना शक्य झालं नाही. त्यांच्या मते, प्रत्येक शस्त्र अनमोल होतं. इथे आपल्याला माणिकरावांची हिंदू जीवनदृष्टी आणि जॉन गुंथरची पाश्चिमात्य व्यापारी जीवनदृष्टी यातला फरकही दिसतो. माणिकरावांना सर्वच हत्यारं अनमोल वाटतात, तर जॉन गुंथरला किमान एका तरी तलवारीची किंमत, भले ती अडीच लाख पौंड इतकी भारी का असेना; पण ठरवता आली.
 
माधवराव पेशवा हा कर्तबगार राज्यकर्ता १७७२ साली क्षय लागून मरण पावला. त्याचा धाकटा भाऊ नारायणराव हा अगदीच सामान्य निघाला. वर्षभरातच म्हणजे १७७३ साली त्याचा सख्खा काका राघोबा याने राज्यलोभाने त्याचा खून पाडला. त्यावेळी नारायणरावाची बायको गरोदर होती. तिला १७७४ साली मुलगा झाला. नाना फडणीस, सखारामबापू, हरिपंत फडके इत्यादी सरदारांनी हा मुलगा काकाप्रमाणे कर्तबगार व्हावा, म्हणून त्यांचं नाव ठेवलं ’सवाई माधवराव.’ तो आठ वर्षांचा असताना म्हणजे १७८२ साली त्याला पेशवेपद देण्यात आलं. सरदार, रयत किंवा इंग्रजांसारखे शत्रूसुद्धा एक राजशिष्टाचार म्हणून या बाल पेशव्याला नाना प्रकारच्या मौल्यवान वस्तू भेट देत असत. पेशवे दफ्तरात या वस्तूंची नोंद आहे. पेशवे, सरदार किंवा समाजातले श्रीमंत सावकार आदी लोकांकडे मूर्ती, चित्रं किंवा पुस्तकं यांचा संग्रह असे. त्याला म्हणायचे ’चित्रशाळा’ आणि ’ग्रंथशाळा.’ राघोबाच्या उपद्व्यापांमुळे उगीचच बदनाम ठरलेली, त्याची बायको आनंदीबाई हिची वैयक्तिक ग्रंथशाळा होती आणि ती स्वतः चांगली वाचक होती.पण, हे सगळे संग्रह खासगी होते. रयतेला म्हणजेच सर्वसामान्य लोकांना ते आजच्या सारखे केव्हाही जाऊन पाहायला उपलब्ध नव्हते. आपल्या संग्रहातल्या या मौल्यवान कलावस्तू, चित्रं, शिल्पं, मूर्ती, वस्त्र, पुस्तकं ही आपल्या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला देखील पाहायला मिळाली पाहिजेत, ही कल्पना प्रथम निर्माण झाली, ती मात्र युरोपमध्ये हे नक्की!
 
झालं असं की, कॅथालिक ख्रिश्चन पंथाचा सर्वोच्च धर्मगुरू जो पोप त्याची गादी व्हॅटिकनमध्ये आहे. व्हॅटिकन हा रोम शहरातला एक भाग आहे. व्हॅटिकनच्या संग्रहात अक्षरशः लाखो अनमोल कलावस्तू आहेत. १४७१ साली तत्कालीन पोप सिक्स्टस चौथा याने व्हॅटिकन धर्मपीठाच्या संग्रहातल्या बर्‍याच कलावस्तू रोमच्या नागरिकांना भेट दिल्या. व्हॅटिकन जवळच असलेल्या कॅपिटोलियन नावाच्या टेकडीवर एका इमारतीत त्या सर्व वस्तू नीट मांडून, त्यांचं वर्णन लिहून ठेवण्यात आलं. नागरिक त्या वस्तू पाहायला, त्यांची माहिती वाचून, त्यांचा अभ्यास करायला किंवा त्यांच्या कलाकारीचा आनंद घ्यायला जात असत. पुढे १५०६ मध्ये तत्कालीन पोप ज्युलियस दुसरा याने व्हॅटिकन संग्रहातल्या सगळ्याच कलावस्तूंचं संग्रहालय बनवायला परवानगी दिली. जगद्विख्यात कलावंत मायकेल अ‍ॅजेलो याने १५३६ साली अतिशय कुशलतेने आराखडा बनवून, ’कॅपिटोलियन म्युझियम’ आणि ’व्हॅटिकन म्युझियम’ यांची अप्रतिम मांडणी केली. म्हणजे गेली ५०० वर्षं ही म्युझियम्स बघायला जगभरातून अक्षरशः लाखो लोक येत असतात.
 
भारतात असं सार्वजनिक संग्रहालय उभं करण्याची कल्पना सर्वप्रथम विल्यम जोन्स याच्या डोक्यात आली. विल्यम जोन्स हा एक विलक्षण माणूस होता. अत्यंत बुद्धिमान, बहुभाषाकोविद असा हा विद्वान १७८३ साली दुय्यम न्यायाधीश म्हणून कोलकात्याला आला. त्याने ताबडतोब संस्कृत भाषा शिकायला सुरुवात केली. पुढच्याच वर्षी म्हणजे १७८४ साली त्याने ’एशियाटिक सोसायटी’ची स्थापना करून, भारताच्या सर्वांगीण अभ्यासला सुरुवात केली.जोन्सच्या हयातीत नव्हे; पण त्याच्यानंतर ’एशियाटिक सोसायटी’च्या सभासदांना जाणवू लागलं की, आपण आपल्या अभ्यासाकरिता किंवा छंद म्हणून जमवलेल्या कलावस्तू, चित्रं, शिल्पं, हस्तलिखित ग्रंथ, नाणी हे सगळं मौल्यवान संचित कुठेतरी एकत्र ठेवलं पाहिजे. पुढे १८०८ साली ’ईस्ट इंडिया कंपनी’ सरकारने ‘एशियाटिक सोसायटी’ला चौरंगी भागात पार्क स्ट्रीटवर एक इमारत दिली. तिच्यात हे सगळं ठेवण्यात आलं; पण तरी त्याला अजून सार्वजनिक संग्रहालयाचं रूप आलेलं नव्हतं.
 
डॉ. नाथानेल वॉलिश हा डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन शहराचा रहिवासी. इंग्रज, फ्रेंच, डच यांच्याप्रमाणेच डेन्मार्कचा म्हणजेच डॅनिश लोकांचाही भारताशी व्यापार होता. या डॅनिश लोकांची एक छोटीशी वसाहत सेरामपोर (म्हणजेच श्रीरामपूर) इथे होती. आज हे श्रीरामपूर कोलकाता महानगराचं एक उपनगर बनलं आहे. या डॅनिश वसाहतीचा डॉक्टर म्हणून नाथानेल वॉलिश १८०८ साली भारतात आला. पुढच्याच वर्षी इंग्रच आणि फ्रेंच यांच्यात श्रीरामपूरला लढाई झाली. डॅनिश लोकांनी फ्रेचांची बाजू घेतली, म्हणून सगळ्या डॅनिश लोकांना कैद करून, कोलकात्याच्या फोर्ट विल्यम तुरुंगात डांबण्यात आलं. पण, नाथानेल हा निष्णात डॉक्टर आहे, असं समजल्यावर त्याची सुटका करण्यात आली. पुढे नाथनेलने ’ब्रिटिश ईस्ट इंडिया’ कंपनीची नोकरी पत्करली. नाथानेल हा उत्तम डॉक्टर तर होताच; पण तो व वनस्पतीशास्त्रज्ञ आणि चित्रकारही होता. भारतातल्या अनेक वनस्पती शोधून, त्याचं शास्त्रीय वर्गीकरण करणं, त्यांना शास्त्रीय नावं देणं आणि त्यांच्या पान-फुला-फळांची रंगीत चित्रं काढून ठेवणं, हे अत्यंत महत्त्वाचं कार्य त्याने केलं. ’एशियाटिक सोसायटी’ला आपल्या संग्रहाचं नीट वर्गीकरण, जतन आणि प्रदर्शन करण्यासाठी सुयोग्य माणूस मिळाला. दि. २ फेब्रुवारी १८१४ या दिवशी भारतातलं पहिलं सार्वजनिक संग्रहालय डॉ. नाथानेल वॉलिशच्या नेतृत्वाखाली सुरू झालं.परमेश्वर सुद्धा काय सूत्रं जुळवतो! भारतात भारतीय कलावस्तू, वनस्पती, प्राणी इत्यादीचं संग्रहालय बनवण्याची कल्पना मांडणारा इंग्रज आणि ते प्रत्यक्ष बनवणारा माणूस डॅनिश!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.