बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही तर संस्था आहे!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन
06-Dec-2024
Total Views | 34
मुंबई : बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नसून ती एक संस्था आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे त्यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतो आहे. याचे सर्व श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे आहे. जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान भारताचे आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक, आर्थिक परिवर्तन घडवण्याचा मुलमंत्र घेऊन हे संविधान तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आज देशापुढे कुठलीही समस्या असली तरी त्याचा उपाय भारताच्या संविधानात दिसतो."
"भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते. त्यांचा सगळ्या विषयात प्रचंड अभ्यास होता आणि तीच दृष्टी संविधानात आलेली पाहायला मिळते. भगवान गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातून जो समतेचा आणि बंधुतेचा संदेश दिला तो संदेश आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपण अंगिकारला. या देशात कायदेमंत्री, मजुरमंत्री, पाठबंधारे मंत्री, वीज मंत्री अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकाळात त्यांनी सगळ्या पायाभूत गोष्टींची मुहुर्तमेढ त्याकाळी केली. केवळ संविधान नाही तर ते अंमलात आणण्याचे व्हिजनही त्यांच्याकडे होते," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही तर ती एक संस्था आहे. हजारों संस्था एकत्रित केल्या तरीसुद्धा बाबासाहेबांचे ज्ञान आणि त्यांचा व्यासंग पूर्ण होऊ शकत नाही. भारतीय संविधानाचा महामार्गच केवळ देशाला महाशक्ती बनवू शकतो. त्यामुळे बाबासाहेबांना नमन करताना भारताच्या संविधानाच्या अनुरुप आमचे आचरण असेल आणि कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचे संविधान आमच्यासाठी महत्वाचे असेल, हा एकच संकल्प सर्वांनी करायला हवा. या महामानवाचे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आम्ही जे काम करू ते संविधानारुप करु आणि काम करत असताना समजातील वंचित असलेल्या व्यक्तीचा विचार पहिल्यांदा आमच्या मनात असेल," असा संकल्पही त्यांनी यावेळी केला. तसेच इंदुमिलवर बाबासाहेबांचे स्मारक तयार करत असून हे काम वेगाने पूर्ण करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.