महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत! गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

जनादेशाचा सन्मान राखण्याचे काम करू

    04-Dec-2024
Total Views |
 
Fadanvis
 
मुंबई : महाराष्ट्राने जनतेने दिलेल्या आदेशामुळे मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनिर्वाचित गटनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. बुधवार, ४ डिसेंबर रोजी फडणवीसांची एकमताने भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली.
 
याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या निवडणूकीने एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है ही गोष्ट आपल्यासमोर ठेवली आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशात विजयाची मालिका सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या आदेशामुळे मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो. हे वर्ष अत्यंत महत्वाचे वर्ष आहे. एकीकडे संविधानाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याने हे वर्ष सर्वार्थाने महत्वाचे आहे. या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण पुन्हा एकदा सरकार स्थापन करतो आहे. तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे हे ३०० वे जयतींवर्ष आहे. त्यासोबतच इंग्रजांच्या विरुद्ध जल, जमीन आणि जंगल वाचवण्याचा लढा उभारून त्यांना सळो की, पळो करून सोडणाऱ्या भगवान बिरसा मुंडांच्या १२५ व्या जयंतीचे वर्ष आपण साजरे करत आहोत. तसेच नवभारताच्या निर्मितीची संकल्पना मांडणाऱ्या अटलबिहारी वाजपेयीजींची यांचेसुद्धा हे १०० वे जयंती वर्ष आहे. त्यामुळे अशा या महत्वपूर्ण वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीवर सगळी जबाबदारी सोपवली आहे. जनतेने इतका मोठा जनादेश दिला की, त्याचा आनंद आहेच पण त्यासोबतच जबाबदारीदेखील वाढली आहे. प्रचंड मोठ्या जबाबदारीची जाणीव करुन देणारा जनादेश जनतेने आपल्याला दिला आहे. या जनादेशाचा सन्मान राखण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे."
 
हे वाचलंत का? -  राज्यात पुन्हा देवेंद्र!
 
"आपण सुरु केलेल्या योजना आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्याकडे आपली प्राथमिकता असेलच पण त्यासोबतच महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपल्या सर्वांना कार्यरत राहायचे आहे. २०१९ ला सुद्धा आपल्याला जनतेचा कौल मिळाला होता. दुर्दैवाने तो हिसकावून घेऊन जनतेशी बेईमानी झाली. सुरुवातीच्या अडीच वर्षात वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्यात आला. अशाही परिस्थितीत अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही, याचा मला अभिमान आहे. सगळे आमदार, नेते संघर्ष करत होते आणि त्यामुळेच २०२२ ला पुन्हा आपले सरकार तयार झाले. आज पुन्हा एकदा महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. यातून महाराष्ट्रात एकप्रकारे इतिहास लिहिला गेला," असे ते म्हणाले.
 
मोदीजींनी एका बुथच्या कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर बसवलं!
 
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यासारख्या बुथचा कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्याला या सर्वोच्च पदापर्यंत तीनवेळा बसवले. ज्याप्रकारे हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे मिळाली आणि काम करण्याची संधी मिळाली, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. महायुतीच्या सरकारमध्ये सर्वांना एकदिलाने सोबत घेऊन काम करावे लागेल. केवळ पदांसाठी नाही तर एक मोठे ध्येय घेऊन आपण राजकारणात आलेलो आहोत. त्यामुळे येत्या काळात चार गोष्टी मनाप्रमाणे होतील तर चार गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा होतील. तरीसुद्धा आपण एकत्रितपणे काम करून आपली शक्ती दाखवून देऊ," असा विश्वासही त्यांनी उपस्थित आमदारांना दिला.