कल्याण : (Kalyan) येथील योगीधाम परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना त्यांच्या शेजारी अखिलेश शुक्ला या अमराठी सरकारी अधिकाऱ्याने गुंड बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी रात्री कल्याणच्या योगीधाम परिसरात तणावाचे वातावरण होते. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी एकत्र येऊन योगीधाम परिसरामध्ये निषेध व्यक्त केला.
नेमकं काय घडलं होतं?
कल्याणच्या खडकपाड्यातील योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. येथे अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे सोसायटीत शेजारी राहतात. नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. या धूपाचा प्रचंड धूर होतो. धूपाचा सगळा धूर वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात जायचा. धूर घरात शिरल्याने वर्षा यांच्या तीन वर्षाच्या बाळाला तसेच वयोवृद्ध सासूला त्रास व्हायचा. त्यामुळे अनेकवेळा कळवीकट्टे कुटुंबीयांनी शुक्ला यांना बाहेर धूप न लावण्याविषयी विनंती केली होती. यावरुन अखिलेश शुक्ला यांची पत्नी गीता शुक्ला यांनी उद्दामपणे कळवीकट्टे कुटुंबीयांशी वाद घालायला सुरुवात केली.
हा वाद सुरू असताना शेजारीच राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. गीता यांनी “मराठी लोक xxx, चिकन खाऊन घाण करणारे”, असे म्हटल्याने देशमुखांनी जाब विचारल्याने तसेच मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने शुक्ला यांचा राग अनावर झाला. मराठी माणसांविषयी अपमानजनक शेरेबाजी करत त्यांनी बोलावलेल्या १० ते १५ गुंडांनी घरात घुसून देशमुख बंधूंना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.
या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्ला हे कायम या सोसायटीत मुजोरी करत असल्याचे समोर आले आहे. अनेक मराठी माणसांना शुक्ला याने त्रास दिला आल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी केला आहे.
प्रत्यक्षदर्शीने दिली घटनेची माहिती
याच सोसायटीत राहणारे विजय कळवीकट्टे यांनी माध्यामांशी बोलताना घडलेल्या प्रसंगाविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, "मी घरी बसलो होतो, तेव्हा मी शुक्ला यांना अभिजित देशमुख यांच्या घराकडे इशारा करताना पाहिले, त्यानंतर काही लोकांच्या जमावाने त्यांच्या दारावर सायकल लावली. मी नेमकं काय सुरु आहे हे पाहण्यासाठी बाहेर गेलो असताच सात-आठ जणांनी अभिजित देशमुख यांना रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली होती. मी थांबवण्याचा प्रयत्न करायला गेलो तर त्यांनी माझ्यावरही हल्ला करत मला बाजूला ढकलले. त्यांनी महिलांनाही मारहाण केली आणि त्यांना मारून टाका, असे म्हणत शिवीगाळ केली. अभिजितला केलेल्या जबर मारहाणीमुळे त्याला दहा ते बारा टाके घालावे लागले आहेत. तसेच त्याला जीवेमारण्याची धमकीही दिली होती."
या घटनेची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गंभीर दखल घेतली आहे. २४ तासांत आरोपींना अटक न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे मनसे नेते उल्हास भोईर यांनी सांगितले आहे. मनसेने देशमुख कुटुंबाला पाठिंबा दर्शवत घटनेचा निषेध केला आहे. कल्याण, ठाणे जिल्ह्यातील एका इमारतीमध्ये किरकोळ वादातून मराठी माणसांना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या शुक्ला नावाच्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असा मनसेच्या कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी इशारा दिला आहे. यासंदर्भात मनसेच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करण्यात आली आहे.
"ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका इमारतीत किरकोळ वादातून, मराठी माणसांना अर्वाच्य शिव्या देणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या शुक्ला नावाच्या माणसाविरोधात कायदेशीर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल", असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला शिव्या देणाऱ्या शुक्लाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरळ करेलच पण मराठी माणसाने देखील आता जागं व्हायला हवं आणि यापुढे जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसाच्या पाठी उभी राहते तसं मराठी जनतेने देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठी उभं रहायला हवं"