मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladesh Election News) बांगलादेशात झालेल्या सत्तांतरानंतर मुहम्मद युनुस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकार येथील सत्ता चालवत आहे. सत्तांतर झाल्यापासून अंतरिम सरकारकडे निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे वाढत्या दबावामुळे, मोहम्मद युनूस यांनी २०२५ च्या उत्तरार्धात किंवा २०२६ च्या सुरुवातीला निवडणुका होतील असे म्हटले जात आहे. हिंदू अल्पसंख्याकांवर इस्लामिक कट्टरपंथींकडून हल्ले होत असताना मुहम्मद युनुस यांनी घेतलेल्या निर्णयाने चर्चाना उधाण आले आहे.
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या नेतृत्वाखालील बीएनपीसह प्रमुख राजकीय पक्षांना देशात लवकर निवडणुका घ्यायच्या आहेत. 'अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नसून केवळ निवडणुकांचा कालावधी मांडला असल्याचे मुहम्मद युनुस यांचे म्हणणे आहे. युनूस यांनी अनेक सुधारणांची आवश्यकता असल्याचे ते सांगतात त्यावर देखरेख करण्यासाठी आयोग सुरू केले आहेत.
बांगलादेशातील निवडणूक प्रक्रिया ही भारतातील लोकसभा निवडणुकीसारखीच आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, सर्वात मोठ्या पक्षाचे किंवा आघाडीचे खासदार त्यांचा नेता निवडतात आणि तो पंतप्रधान होतो. येथील संसदेच्या एकूण ३५० जागा आहेत. त्यापैकी ५० जागा महिलांसाठी राखीव आहेत. राखीव जागांसाठी निवडणुका नाहीत, तर दर पाच वर्षांनी ३०० जागांसाठी सार्वत्रिक निवडणुका होतात.