पॅलेस्टाईन, पाकिस्तान नंतर बांगलादेश पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक!

    14-Dec-2024
Total Views |

Journalist is Bangladesh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladesh dangerous for journalists) 
बांगलादेश हा पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक देश असल्याचे ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’च्या (आरएसएफ) एका अहवालातून समोर आले आहे. आरएसएफ ही एक माहितीच्या अधिकाराचे रक्षण करणारी आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था आहे. आरएसएफद्वारे प्रकाशित २०२४ च्या राउंड-अपनुसार, पॅलेस्टाईन हा पत्रकारांसाठी सर्वात धोकादायक देश आहे, त्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशचा क्रमांक लागतो. हत्या आणि अपहरणांसह पत्रकारांवरील विविध हल्ल्यांच्या आधारे ही रँकिंग करण्यात आली आहे.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात, आरएसएफने म्हटले आहे की पत्रकारांवरील लक्ष्यित हल्ल्यांमध्ये विशेषतः राजकीय अशांतता आणि निषेधाच्या वेळी चिंताजनक वाढ झाली आहे. अहवालानुसार, पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांत झालेल्या तीव्र निदर्शनांमध्ये ऑन ड्युटीवर असलेल्या अनेक पत्रकारांचा जीव गेला. बांगलादेशात सत्तांतराच्या नाट्यादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान पाच पत्रकारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलांनी पत्रकारांना लक्ष्य करणे योगायोगाने घडले नाही, कारण अधिकाऱ्यांनी सरकार उलथून टाकलेल्या जन उठावाचे कव्हरेज दडपण्याचा प्रयत्न केला”, असे अहवालात म्हटले आहे.
 
त्यात पुढे असेही म्हटले आहे की बांगलादेशच्या सुरक्षा दलांनी सन २०२४ मध्ये प्रेस स्वातंत्र्यालाही धोका निर्माण केला होता. २०२४ मध्ये सुमारे ५४ पत्रकारांनी आपले प्राण गमावले, त्यापैकी २ महिला होत्या. अहवालानुसार ५४ पैकी सुमारे १६ जणांनी पॅलेस्टाईनमध्ये, ७ जणांनी पाकिस्तानात, ५ जणांनी बांगलादेशात, ५ जणांनी मेक्सिकोमध्ये आणि ४ जणांनी सुदानमध्ये अखेरचा श्वास घेतला. पुढे, त्यात म्हटले आहे की अर्ध्याहून अधिक पत्रकारांचा संघर्ष झोनमधील तथ्ये वार्तांकन करताना मृत्यू झाला.
 
शेख हसीना यांचे सरकार पडल्यापासून बांगलादेशातील इस्लामी अल्पसंख्याकांवर लक्ष्यित हल्ले करत आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. अंतरिम सरकारने अलीकडेच मान्य केले आहे की गेल्या साडेतीन महिन्यांत अशा सुमारे ८८ घटना घडल्या आहेत. आता हे समोर आले आहे की केवळ अल्पसंख्याकच नाही तर मीडिया व्यावसायिकांनाही बांगलादेशच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून धमक्यांचा सामना करावा लागत आहे.
 
याशिवाय, आरएसएफच्या अहवालात असे नमूद केले आहे की चीन, म्यानमार आणि इस्रायल सारख्या देशांनी पत्रकारांना त्यांच्या नोकरीच्या वेळी ताब्यात घेतलेल्या देशांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. चीनने सुमारे १२४, म्यानमारने ६१ आणि इस्रायलने ४१ पत्रकारांना ताब्यात घेतले आहे. गेल्या वर्षभरात ५५ पत्रकारांना ओलिस ठेवण्यात आले असून त्यापैकी ३८ सीरियामध्ये, ९ इराकमध्ये, ५ येमेनमध्ये, २ मालीमध्ये आणि १ मेक्सिकोमध्ये ओलिस ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी २५ जणांना 'आयएसआयएस' ने ओलीस ठेवले आहे. उल्लेखनीय म्हणजे, आरएसएफने म्हटल्यानुसार जगभरात सुमारे १०० पत्रकार सध्या बेपत्ता आहेत. त्यापैकी एक चतुर्थांशहून अधिक गेल्या १० वर्षांत गायब झाले आहेत.