संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का? चित्रा वाघ यांचा राहुल गांधींना सवाल
07-Nov-2024
Total Views | 81
मुंबई : राहुल गांधी, तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. भाजपकडून नागपूरमधील सभेतील संविधानाच्या पुस्तकाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यात हे पुस्तक कोरेच असल्याचे दिसले. त्यामुळे संविधानाच्या कोऱ्या प्रती वाटल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "राहुल गांधी तुम्ही लोकसभा निवडणुकीपासून हातात संविधान घेऊन संविधान वाचवा म्हणून जो काही कांगावा करत आहात, त्यातला खोटे पणा जनतेच्या कधीच लक्षात आला आहे. पण काल मात्र तुम्ही हद्दच केली. संविधानाच्या कोऱ्या प्रती तुम्ही वाटल्या आणि तिच प्रत हातात घेऊन खोटी नाटी अश्वासनं दिलीत. तुमचे नेते विजय वड्डेटीवार तुमची बाजू घेण्याच्या नादात आणि भाजपला खोटं ठरवण्याच्या नादात म्हणाले ते लाल रंगाचे नोटपॅड होते. म्हणजेच एकार्थाने त्यांनी तुमचा हा थिल्लरपणा कबुलही केला."
"कोरं संविधान छापणं हा आमच्या महामानवाचा अपमान आहे. तो आम्ही भारतीय सहन करणार नाही. तुमच्यासाठी शाहु-फुले-आंबेडकर हे फक्त भाषण करण्याचे मुद्दे असतील आमच्यासाठी तो स्वाभिमान आहे. आणि संविधान म्हणजे भारताचा आत्मा आहे. जनता तुम्हाला माफ करणार नाही," असेही त्या म्हणाल्या.