लाडकी बहिण संदर्भात महत्वाची घोषणा : डिसेंबरमध्येच मिळणार पुढील हप्ता!
तुम्ही ताकद दिली तर पैसेही वाढणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
05-Nov-2024
Total Views |
सातारा : राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. निवडणूका झाल्यानंतर डिसेंबरमध्येच पुढील हप्ता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ साताऱ्यातील कोरेगाव येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्हाला आज जिकडे तिकडे लाडक्या बहिणींचं प्रेम पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणल्यावर विरोधकांचं पोट दुखायला लागलं. आचारसंहिता लागेल म्हणून ऑक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे बहिणींच्या खात्यात टाकले. पण विरोधक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. परंतू, कोणीही आलं तरी लाडकी बहिण योजना बंद करू शकणार नाही."
"आम्ही पुर्ण पैशांचं नियोजन करुन ही योजना सुरु केली आहे. २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होऊन २३ नोव्हेंबर निकाल लागला की, डिसेंबर महिन्याचे पैसे आम्ही तुमच्या खात्यात टाकणार आहोत. फक्त डिसेंबरच नाही तर पुढच्या पुर्ण कालावधीच्या पैशांचं नियोजन आम्ही केलं आहे. आमच्या लाडक्या बहिणींना फक्त १५०० रूपयांवर ठेवायचं नाही, असं आम्ही ठरवलं आहे. तुम्ही ताकद दिली तर तुमचे पैसे वाढतील. दीडचे दोन, दोनचे अडीच आणि अडीच तीन हजार होतील. आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे," असेही ते म्हणाले.