भारतास लक्ष्य करण्याचे कॅनडाचे प्रयत्न हास्यास्पद : परराष्ट्र मंत्रालय
21-Nov-2024
Total Views |
नवी दिल्ली : (India ) भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या वर्तमानपत्रातील दहशतवादी निज्जरच्या संबंधातील वृत्त फेटाळून लावले. मंत्रालयाने अशा अहवालांना हास्यास्पद म्हटले आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडू शकतात.
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध अनेक दिवसांपासून तणावाचे आहेत. कॅनडा सरकार आणि तेथील प्रसारमाध्यमे भारतावर सातत्याने खोटे आरोप करतच आहेत. भारत सरकारने बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी कॅनडाच्या एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेले वृत्त पूर्णपणे फेटाळले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येचा कट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहित होता, असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून अशा वृत्तांना हास्यास्पद म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारत सहसा वृत्तांवर भाष्य करत नाही. तथापि, कॅनडाच्या सरकारी स्रोताने वृत्तपत्रात कथितपणे केलेल्या अशा हास्यास्पद विधानास अशाचप्रकारे खोडून काढणे आवश्यक आहे. अशा बदनामीकारक मोहिमांमुळे दोन्ही देशांचे अगोदरच ताणलेले संबंध आणखी बिघडण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचेही जयस्वाल यांनी नमूद केले आहे.