प्रणिती शिंदेंची काँग्रेसमधून हकालपट्टी करा! "हिंमत असेल तर सोलापूर जिल्ह्यात...";

दक्षिण सोलापूरमध्ये उबाठा गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

    21-Nov-2024
Total Views |
 
Praniti Shinde
 
सोलापूर : प्रणिती शिंदेंची काँग्रेसमधून हकालपट्टी करून त्यांची खासदारकीसुद्धा रद्द करावी, अशी मागणी उबाठा गटाचे नेते शरद कोळी यांनी केली आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. मात्र, याठिकाणी उबाठा गटाचे अमर पाटील हेसुद्धा उमेदवार होते. त्यामुळे आता यावरून शरद कोळी चांगलेच संतापले असून त्यांनी प्रणिती शिंदेंना खडेबोल सुनावले.
 
शरद कोळी म्हणाले की, "गद्दार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा घात केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचा घात केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी ताबडतोब त्यांची हकालपट्टी करावी. एवढंच नाही तर काँग्रेसने त्यांची खासदारकीसुद्धा रद्द करावी. शिवसेनेच्या जीवावर प्रणिती शिंदे खासदार झाल्या. उद्धव साहेब आजारी असताना निवडून येण्यासाठी त्यांनी उद्धव साहेबांचे बूट पुसण्याचे काम केले आणि आजारी असतानासुद्धा त्यांनी प्रणिती शिंदेंसाठी सभा घेतली. पण त्यांना याची जाण राहिली नाही. ही गद्दार माणसं आहेत. प्रणिती शिंदेंनी भाजपची सुपारी घेतली असून त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे. खासदारकी मिळवण्यासाठी भाजपने त्यांना मदत केली होती. त्यामुळे इथे त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला. परंतू, आम्हाला काहीही फरक पडत नाही. आमचाच उमेदवार निवडून येणार आहे."
 
हे वाचलंत का? -  मविआला १६० ते १६५ जागा मिळणार; एक्झिट पोलच्या अंदाजानंतर संजय राऊतांचा दावा
 
"मात्र, महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवाल्यांना ठेचून काढायला हवे. प्रणिती शिंदेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे आम्ही याची परतफेड करणार आहे. हिंमत असेल तर त्यांनी यापुढे सोलापूर जिल्ह्यात फिरून दाखवावे. त्या जिथे दिसतील तिथे त्यांची गाडी अडवून फोडून टाकण्याचे काम करु. प्रणिती शिंदे शिवसेनेच्या जोरावर खासदार झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली होती. पण उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने त्या खासदार झाल्यात. मात्र, त्या एवढ्या लवकर धोका देतील असे वाटले नव्हते. इथून पुढे खासदारकी विसरून जा," असा इशाराच शरद कोळींनी दिला आहे.
 
सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले?
 
"दक्षिण सोलापूरमध्ये आम्ही धर्मराज काडादी यांना मतदान करण्यासाठी आलो आहोत. शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली. दक्षिण सोलापूर मतदार संघातून मी दोनदा विजयी झालो. हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. कधीतरी एकदाच त्यांचा उमेदवार निवडून आला आणि यावरून त्यांनी हा मतदारसंघ स्वत:च्या नावावर केला. पण हे चुकीचे आहे. आम्ही हे सगळे त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे," असे त्यांनी जाहीरपणे स्पष्ट केले.