जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार! नायब सिंह सैनी यांचा घणाघात
12-Nov-2024
Total Views | 33
मुंबई : काँग्रेस जिथे जिथे सत्तेत होती तिथे तिथे तीव्र गतीने भ्रष्टाचार वाढला. काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये खोटी आश्वासने दिली आणि भ्रष्टाचार करून लोकांना लुटले, असा घणाघात हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी केला आहे. मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.
नायब सिंह सैनी म्हणाले की, "काँग्रेसने देशात अनेक वर्षे राज्य केले. परंतू, २०१४ ते २०२४ या मागील १० वर्षात जी विकासाची गती पाहायला मिळाली ती काँग्रेसच्या काळात नव्हती. काँग्रेस हवेत काम करते आणि भ्रष्टाचार वाढवण्यासाठी काम करते. मात्र, मोदीजी आणि भाजप विकासाची गती वेगाने वाढवत सामान्य माणसाचे जीवन समृद्ध करण्याचे काम करत आहे. याचाच परिणाम म्हणून हरियाणामध्ये तिसऱ्यांदा भाजपचे सरकार बनले. मोदीजींनी प्रत्येक वर्गासाठी काम केले. महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक आणले. तसेच अनेक योजना आणत महिलांना सशक्त करण्याचे काम केले. विविध योजनांद्वारे युवकांना रोजगार देण्यात येत आहे."
"काँग्रेस जिथे जिथे सत्तेत होती तिथे तिथे तीव्र गतीने भ्रष्टाचार वाढला. काँग्रेसने खोटी आश्वासने दिली. परंतू, ती जास्त काळ चालत नाहीत. काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये खोटी आश्वासने दिली. हिमाचलमध्ये काँग्रेसने महिलांना २ हजार रुपये आणि युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. खोटं बोलून मते घेतली आणि सरकार येऊन दोन वर्षे झाल्यानंतरही कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. काँग्रेस भ्रष्टाचार करून लोकांना लुटण्याचे काम करते," अशी टीका त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "मोदीजींनी दिलेली आश्वासने १०० टक्के पूर्ण केलीत. रस्ते आणि रेल्वेची कामे पाहता नरेंद्र मोदींच्या डबल इंजिन सरकारने देशाला जवळ आणण्याचे काम केले. काँग्रेसच्या काळात ५५ वर्षात केवळ ७० विमानतळे होती. मात्र, या १० वर्षात १५० पेक्षा जास्त विमानतळे लोकांच्या सेवेत आहेत.
महाराष्ट्रात दुसऱ्यांदा महायूतीचे सरकार येणार!
"काँग्रेसने कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाचा सन्मान केला नाही. संविधान धोक्यात आहे असे काँग्रेस सांगते. पण मोदीजींच्या नेतृत्वात देश संविधानानानुसार चालतोय. मात्र, काँग्रेस संपुष्टात आल्याने काँग्रेसचे लोक भाजपविरोधात काहीही बोलत आहेत. काँग्रेसला देशातून लोक बाहेर करत आहेत. राहुल गांधींनी अमेरिकेत आरक्षण संपवण्याची भाषा केली आणि इकडे येऊन मोदीजींवर आरोप केले. त्यामुळे काँग्रेसचा हा चेहरा देशासमोर आला आहे. महाराष्ट्रात येत्या २३ तारखेला मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीएचे सरकार निवडून येणार आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.