काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन जनतेला लुबाडले : खासदार अनुराग ठाकूर

भाजपकडून "मविआ"च्या फसव्या घोषणांची पोलखोल!

    12-Nov-2024
Total Views |
 
BJP
 
मुंबई : कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील भाजप नेत्यांनी मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेत काँग्रेसची पोलखोल केली आहे. खासदार अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री डी किशन रेड्डी आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला. निवडणूकीच्या आधी कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये दिलेली अनेक आश्वासने फोल ठरल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रेम शुक्ला आणि अतुल शाह उपस्थित होते.
 
याप्रसंगी बोलताना खासदार अनुराग ठाकुर म्हणाले की, "महायूतीचे घोषणापत्र हे देशाला एका नवीन उंचीवर नेणारे आहे. परंतू, देशातील अन्य राज्यांमध्ये निवडणूकीच्या वेळी काँग्रेसने अनेक खोटी आश्वासने दिली आणि जनतेला लुबाडण्याचे काम केले. लोकसभा निवडणूकीवेळीसुद्धा काँग्रेसने संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला. मात्र, दुसरीकडे, राहुल गांधीकडे असलेल्या लाल संविधानाचे पुस्तक आतून कोरेच आहे. हे कोऱ्या पानाचे संविधाने पुस्तक वाटण्यामागे काँग्रेसचा मोठा डाव आहे. काँग्रेसने संविधान लिहिणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करून राजकारणातून बाहेर केले."
 
"काँग्रेसने हिमाचल प्रदेशात १० गॅरंटी दिल्या होत्या. २ रुपये किलोप्रमाणे शेण आणि १०० रुपये लीटरप्रमाणे दुध खरेदी करणार तसेच महिलांना प्रतिमहा १५०० रुपये देणार अशी आश्वासने दिली होती. परंतू, दोन वर्षे होऊनही यातील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. ३०० युनिट मोफत वीज देण्याचेही आश्वासन काँग्रेसने दिले होते. मात्र, त्यांनी आपले आश्वासन पूर्ण केले नाहीच शिवाय भाजपकडून मिळत असलेली १२५ युनिट मोफत वीजही बंद केली. युवकांना ५ लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. परंतू, ५ हजार नोकऱ्यासुद्धा देऊ शकले नाहीत. प्रत्येक गावात मोबाईल क्लिनिक देऊ, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनाच उपचारासाठी बाहेरगावी जावे लागते. काँग्रेसने खोटी आश्वासने दिलीत त्यामुळे आता ते तोंडावर पडले आहेत. महाराष्ट्रात महावसूली आघाडी असून ती महाविनाश आघाडीच्या रुपात काम करते. आमच्या राज्यांमध्ये काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन काँग्रेस सत्तेत आली आणि सरकार आल्यानंतर लोकांची फसवणूक केली," असे त्यांनी सांगितले.
 
कर्नाटक आणि तेलंगणा राज्य काँग्रेससाठी एटीएम!
 
"तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी महाराष्ट्रात येऊन खोटा प्रचार केला. तेलंगणामध्ये काँग्रेसचे सरकार येऊन ३४० दिवस झालेत. पण या दिवसांत एकही आश्वासन पूर्ण केले नाहीत. काँग्रेसने जनतेला ६ गॅरंटी दिल्यात. यासोबतच ४२० सब गॅरंटीसुद्धा दिल्या. या गॅरंटी देऊन सर्व वर्गातील लोकांची मते घेतली आणि त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. कर्नाटक आणि तेलंगणा हे दोन्ही राज्य काँग्रेससाठी एटीएम बनले आहेत. तेलंगणामध्ये आज काँग्रेस सरकार राहुल गांधी आणि रेवंथ रेड्डी हे 'आर आर' टॅक्स धोरण राबवत आहे. ते उद्योग, रिअल इस्टेट कंपनी, उत्पादन युनिट, सरकारी जमीनी या सगळ्या क्षेत्रातील लोकांची आपल्या पदाचा गैरवापर करून लूट करतात. तेलंगणामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर देशात जेवढ्या निवडणूका झाल्या त्या सगळ्याच निवडणूकींमध्ये तेलंगणा काँग्रेस सरकारच्या एटीएममधून पैसे आणत राहुल गांधी खर्च करत आहेत. हा तेलंगणातील जनतेच्या कष्टाचा पैसा आहे."
 
- केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी
 
कर्नाटकमध्ये काँग्रेसने एकही आश्वासन पूर्ण केले नाही!
 
केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या की, "काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांची गाडी कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलगंणा अशी फिरून आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. निवडणूकीच्या १८ महिन्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे कर्नाटकमध्ये येऊन जितके पैसे असतील तेवढीच आश्वासने द्या, असे आपल्या भाषणात सांगतात. १८ महिन्यांच्या आधी कर्नाटकमध्ये काँग्रेसने ५ गॅरंटी दिल्या आणि राज्य बुडवले. २०२२ मध्ये कर्नाटक सरकारवर ४६ हजार कोटी रुपये कर्ज होते. मात्र, आता १८ महिन्यात हे कर्ज ८२ हजार कोटी रुपये झाले आहे. महिलांना बसमध्ये मोफत प्रवास देण्याची काँग्रेसने गॅरंटी दिली होती. त्यामुळे कर्नाटकमधील संपुर्ण रस्ते वाहतूक महामंडळ तोट्यात आले. बसमध्ये डिझेल टाकण्यासाठी, चालक वाहकांना पगार देण्यासाठीही आता पैसे शिल्लक नाहीत. महाराष्ट्रातही आता तीच खोटी आश्वासने देण्यात येत आहे," असे त्यांनी सांगितले.
 
वक्फ बोर्ड संदर्भात बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, "काँग्रेसने जमीर अहमद खान नावाच्या मंत्र्यांना प्रत्येक जिल्ह्यात पाठवले. तिथे जाऊन ते उपायुक्तांना धमकी देऊन शेतकऱ्यांच्या जमिनींवर वक्फचा बोर्ड लावतात. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात हजारों एकर जमिनी वक्फ बोर्डला दिल्या. गावेच्या गावे वक्फला दिली आहेत," अशी पोलखोलही शोभा करंदलाजे यांनी केली आहे.