- मतदान यंत्राची बॅटरी खराब, म्हणून पराभव झाल्याचा हास्यास्पद दावा
08-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली : हरियाणामध्ये वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) बॅटरी खराब होती, त्यामुळेच आमचा पराभव झाला; असे रडगाणे काँग्रेस पक्षाकडून सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवून सत्तास्थापनेची हॅटट्रीक साधली आहे. भाजपला एकूण ९० जागांपैकी ४८ जागांवर विजय मिळाला आहे, तर काँग्रेसला केवळ ३७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मतमोजणीस सकाळी ८ वाजता प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीचे काही तास काँग्रेस आघाडीवर असल्याचे आणि सत्तास्थापन करणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर भाजपने निर्णायक आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला. त्यामुळे प्रारंभी आनंद व्यक्त करणारे काँग्रेसजन चांगलेच गांगरले. सायंकाळपर्यंतही भाजपचीच आघाडी कायम राहिल्याचे चित्र होते. परिणामी आपला पराभव मान्य करण्याऐवजी काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग आणि ईव्हीएमला लक्ष्य केले आहे.
मतमोजणी सुरू असताना भाजपला आघाडी मिळताच काँग्रेसने प्रथम केंद्रीय निवडणूक आयोगास लक्ष्य केले. त्यासाठी काँग्रेसने मोठा मजेशीर आरोप केला. विविध वृत्तवाहिन्यांवर चर्चेस आलेले काँग्रेसचे प्रवक्ते, काँग्रेससचे हरियाणातील सर्वेसर्वा भुपेंदरसिंह हुड्डा यांच्यासह सर्वांनी हा आरोप सायंकाळपर्यंत कायम ठेवला. तो आरोप म्हणजे, प्रत्यक्षात जास्त फेऱ्यांची मतमोजणी झाली असून आयोगाच्या संकेतस्थळावर मात्र भाजप उमेदवार आघाडीवर असलेल्या फेऱ्यांचीच आकडेवारी देण्यात येत आहे. मात्र, असे केले तरीही जय – परायजयावर त्याचा काय परिणाम होणार; याचे उत्तर काँग्रेसकडे नव्हते.
मतमोजणी अंतिम टप्प्यात आल्यावर आणि भाजपचा विजय निश्चित झाल्यानंतर सालबादाप्रमाणे ईव्हीएमला लक्ष्य केले. काँग्रेसचे माध्यमप्रभारी जयराम रमेश आणि नेते पवन खेडा यांनी पत्रकारपरिषद घेऊन ईव्हीएमची बॅटरी खराब असल्याचा नवा आरोप केला. ज्या ईव्हीएमची बॅटरी ९० टक्के होती, तेथे भाजपचा विजय; तर ज्या ईव्हीएमची बॅटरी ६० ते ७० टक्के होती, तेथे काँग्रेसचा पराजय झाल्याचा अजब दावा पवन खेडा यांनी केला. त्याचप्रमाणे हरियाणाचा निकाल मान्य नसल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.
दिल्ली ते हरियाणा - काँग्रेस नेते हतबल
केंद्रीय निवडणुक आयोगावर सर्वप्रथम आरोप करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना काँग्रेसचा पराभव चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून आले. काँग्रेसतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते हतबल होऊन निकाल मान्य नसल्याचे सांगत होते. अशीच स्थिती मुख्यमंत्रीपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून तयार असलेल्या भुपेंदरसिंह हुड्डा यांची होती. त्यांना तर सायंकाळपर्यंत काँग्रेसचा पराभव झाला असल्याचे पचवता आले नव्हते.