"अनेक वर्षे अनेकांना संधी असतानासुद्धा..."; मुख्यमंत्री शिंदेंची टीका
05-Oct-2024
Total Views | 120
वाशीम : अनेक वर्षे अनेक लोकांना संधी असतानासुद्धा मराठी भाषेचा गौरव करण्याचा योग त्यांना मिळाला नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर केली. ते वाशिममधील कार्यक्रमात बोलत होते. वाशिमधील पोहरादेवीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण पार पडलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं मोठं काम पंतप्रधान मोदीजींनी केलं आहे. गेली अनेक वर्षे अनेक लोकांना संधी असतानासुद्धा या मराठी भाषेचा गौरव करण्याचा योग त्यांना मिळाला नाही. पण त्यालाही योगायोग लागतो. त्यामुळे नवनवीन मोठमोठे कामं आणि निर्णय मोदीजींच्या काळात होतं, हा इतिहास आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मोदीजी महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत. ते महाराष्ट्राला भरभरून देतात. ते आमच्याकडून कामंही करून घेतात आणि पाठीवर शाबासकीची थापही देतात. परंतू, त्यानंतरही विरोधक टीका करतच राहतात. पण 'जलने वाले जलेंगे, पढने वाले आगे बढेंगे, मोदीजी के नेतृत्व में हम पुरे विश्व पर राज करेंगे'" असे ते म्हणाले.
"केवळ मुंबई, पुणे नाही तर सगळी शहरं विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणारी उर्जा, सामर्थ्य आणि ईच्छाशक्ती आम्हाला मोदीजींकडून मिळते. अशीच उर्जा आता संत सेवालाल यांच्या स्मारकामुळेसुद्धा मिळणार आहे. आता एक मोठं काम उभं राहिलेलं आहे. संजय राठोड यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न केले," असेही ते म्हणाले.