पोहरागडावर येणारे मोदीजी हे पहिले पंतप्रधान : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
05-Oct-2024
Total Views |
वाशिम : बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरागडावर येणारे नरेंद्र मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी वाशिममधील पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं बंजारा समाजाशी एक विशेष नातं आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरागडावर येणारे मोदीजी हे पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो."
"रामरावबापूंनी आम्हाला इथल्या विकासाची आणि बंजारा संग्रहालयाची जबाबदारी दिली होती. आज आम्हाला ही संधी मिळाली याचा आनंद आहे. आम्हाला निश्चितपणे रामरावबापूंचा आशीर्वाद मिळणार आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना आणली आणि आम्हीसुद्धा त्यासोबत नमो किसान सन्मान योजना आणली. त्याद्वारे आज शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार रुपये जाणार आहेत," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ, असं आम्ही सांगितलं होतं. त्यासाठी आम्ही वीजेचं सोलरायजेशन सुरु केलं आणि आज मोदीजींच्या हस्ते पहिल्या पाच प्रकल्पांचं उद्धाटन होत आहे. पुढच्या १८ महिन्यात महाराष्ट्रातील एकूण एक शेतकऱ्याला १८ तास वीज मिळेल," असे आश्वासनही त्यांनी दिले.