बीड : दसऱ्याच्या मुहुर्तावर दरवर्षीप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा भगवान गडावर दसरा मेळावा पार पडला. यावर्षी पहिल्यांदाच या दसरा मेळाव्यात पंकजाताईंचे बंधू मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंकजाताईंचे कौतूक करत तुफान भाषण केलं.
धनंजय मुंडे म्हणाले की, "दसरा मेळाव्याची परंपरा फक्त बीड जिल्ह्यात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा जगात प्रसिद्ध आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळावा सुरु केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा आहे. बीड जिल्ह्यात संत भगवानबाबानंतर मुंडे साहेबांनी दसरा मेळावा सुरु केला आणि पंकजाताईंनी ती परंपरा पुढे सुरु ठेवलेला हा दसरा मेळावा आहे. दसरा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. ज्याला दसरा माहिती आहे त्याला प्रभू रामचंद्रदेखील माहिती असायला हवे. प्रभू रामचंद्रांशिवाय या दसऱ्याचं महत्व नाही. आज १२ वर्षांच्या तपानंतर मी माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी या दसरा मेळाव्यात आलोय. ताईंनी अनेक संघर्षातून हा मेळावा केला. कुठल्याही संकटाला त्या घाबरल्या नाहीत. आपलं १२ वर्ष जमलं नसलं तरी मी कधीही वेगळा दसरा मेळावा करण्याचं मनात आणलं नाही. हा संपुर्ण समुदाय एकसंघ झाला तर कुणीही एखादा नवीन दसरा मेळावा सुरु करून या दसरा मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही, ही पंकजा ताईंची ताकत आहे," असा टोला त्यांनी मनोज जरांगेंचे नाव न घेता लगावला आहे.
ते पुढे म्हणाले की, "संघर्ष सगळ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. पण या संघर्षाच्या काळात सर्वांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या दसरा मेळाव्याचा पंकजाताईंनी वारसा सुरु ठेवला आहे. आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणं गरजेचं आहे," असे म्हणत धनंजय मुंडेंनी एक शेर सादर करून आपल्या भाषणाची सांगता केली. 'तुम लाख कोशिश करो हमें हराने की, हम जब जब बिखरेंगे दुगनी रफ्तार से निखरेंगे,' असे ते म्हणाले.