इस्रायल-हमास युद्ध विस्तारू शकते

    09-Jan-2024   
Total Views |
Israel - hamas war

इस्रायलने ’हमास’विरुद्ध पुकारलेले युद्ध लांबत असून त्यास तीन महिने पूर्ण झाले आहेत. इस्रायलवर दहशतवादी हल्ले करणार्‍या अतिरेक्यांचा खातमा करणे, बंधकांची सुटका करणे आणि भविष्यात ’हमास’कडून हल्ले होऊ नयेत, यासाठी इस्त्रायलने मोहीम हाती घेतली आहे. या युद्धाची व्याप्ती टाळण्याचे प्रयत्न होत असले तरी त्यास यश येण्याची शक्यता नाही.

इस्रायलने ’हमास’विरुद्ध पुकारलेल्या युद्धाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर दहशतवादी हल्ले करणार्‍या अतिरेक्यांचा खातमा करणे, त्यांनी बंधक बनवलेल्या लोकांची सुटका करणे आणि भविष्यात ’हमास’कडून इस्रायलविरोधात हल्ले होऊ नयेत, यासाठी गाझा पट्टीतील जमिनीखालची भुयारं आणि दहशतवादी तळ पूर्णतः उद्ध्वस्त करणे अशी उद्दिष्टं ठेवून, दि. २७ ऑक्टोबरच्या आसपास इस्रायली सैन्य गाझा पट्टीत घुसले. इस्रायलच्या अंदाजानुसार, त्यांनी ’हमास’च्या सुमारे ३० हजारांपैकी नऊ हजारांहून अधिक दहशतवाद्यांना संपवले असून, त्यांच्याकडील रॉकेटचा साठा जवळपास उद्ध्वस्त केला आहे. इस्रायल आणि अन्य देशांचे १०० हून अधिक नागरिक आजही ’हमास’च्या ताब्यात आहेत. काही बंधकांना ’हमास’ने मारले असून, तीन बंधक ’हमास’च्या तावडीतून पळाले असताना, इस्रायलच्या सैन्याकडून अनवधानाने मारले गेले. या आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँथोनी ब्लिंकन पुन्हा एकदा पश्चिम आशियाच्या दौर्‍यावर आले होते.

गेल्या ९४ दिवसांतील हा त्यांचा चौथा दौरा होता. या दौर्‍यात त्यांनी जॉर्डन, कतार, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि इजिप्त या अरब देशांसह तुर्किये, ग्रीस, पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि इस्रायलला भेट दिली. या युद्धाची व्याप्ती आणखी वाढू नये, यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे.’हमास’च्या दहशतवाद्यांसह या युद्धात आतापर्यंत गाझा पट्टीतील सुमारे २२ हजार लोक मारले गेले आहेत. दि. ३ जानेवारी २०२० रोजी इराणचा वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि इस्लामिक रिवॉल्युशनरी गार्डचा प्रमुख कासिम सुलेमानीची बगदादमध्ये ड्रोन हल्ल्याद्वारे हत्या करण्यात आली होती. त्यामागे अमेरिकेचा हात असल्याची चर्चा आहे. सुलेमानी हा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यानंतर सर्वात शक्तिशाली नेता समजला जायचा. त्याने इराक, सीरिया, लेबेनॉन, गाझा पट्टी तसेच येमेनमध्ये विविध दहशतवादी संघटना उभ्या करण्यात, महत्त्वाची भूमिका बजावली होती. या घटनेला तीन वर्षं होत असताना, इराणमध्ये सुलेमानीला श्रद्धांजली द्यायला मोठी गर्दी जमली होती. त्यात झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये सुमारे ८४ लोक मारले गेले. गेल्या ४० वर्षांमध्ये इराणमध्ये झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. ’इसिस’ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असली, तरी इराणने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे.

या घटना घडत असताना, इस्रायलने एका आठवड्यात ’हमास’च्या राजकीय संघटनेचा उपाध्यक्ष सालेह अल अरौरी आणि हिजबुल्लाच्या विसम अल ताविलची लेबेनॉनमध्ये हवाई हल्ल्यांत हत्या केली. सालेह हा ’हमास’च्या कासम ब्रिगेड रॉकेट विभागाचा पहिला प्रमुख होता. सुरुवातीला चार किमींचा टप्पा गाठणार्‍या, रॉकेटचा पल्ला वाढवून, तो सुमारे १२० किमीपर्यंत नेण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. इस्रायली सैन्याच्या कारवाईत १०० मीटर लांबीच्या भुयारात ’हमास’चा रॉकेट बनवण्याचे केंद्र उद्ध्वस्त करण्यात आले. इराणकडून मिळालेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे ’हमास’ आपल्या रॉकेटची अचूकता आणि मारक क्षमतेत वाढ करत होता. विसम अल ताविल वयाच्या १४व्या वर्षी हिजबुल्लामध्ये सहभागी झाला. १९८२ ते २००० सालापर्यंत दक्षिण लेबेनॉनमध्ये इस्रायलने सैन्य तैनात केले होते. विसम अल ताविलने या काळात इस्रायली सैन्यावर अनेक हल्ले केले होते. २००६ साली हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी इस्रायलची सीमा पार करून, दोन इस्रायली सैनिकांना ताब्यात घेतले आणि इतरांची हत्या केली. त्यामध्येही विसम अल ताविलने सहभाग घेतला होता. इस्रायलने सीमेजवळील हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हवाई हल्ले केल्यामुळे, हिजबुल्ला या युद्धात सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे.

’हमास’च्या तुलनेत हिजबुल्ला अधिक धोकादायक आहे. हिजबुल्लाने आपल्याकडे एक लाख सैनिक असल्याचा दावा केला आहे. त्यांच्याकडे एक लाखांवर क्षेपणास्त्रे आहेत आणि त्यातील काही क्षेपणास्त्रे दीर्घ पल्ल्याची आहेत. हिजबुल्लाने सीरियातील बशर अल असाद सरकारच्या बाजूने ‘इसिस’ विरुद्ध युद्धात सहभाग घेतला असल्याने, त्यांना प्रत्यक्ष लढाईचा अनुभव आहे. हिजबुल्ला ही शिया संघटना असल्यामुळेच ‘हमास’च्या तुलनेत ती इराणशी अधिक एकनिष्ठ आहे. २००६ साली हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यामध्ये ३४ दिवस युद्ध झाले. त्यात इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमधील हिजबुल्लाचे तळ बेचिराख केले असले, तरी हिजबुल्लाला रॉकेटचा मारा करण्यापासून थांबवण्यात इस्रायलला अपयश आले.इस्रायलच्या मित्र राष्ट्रांकडून त्याला सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे की, लष्करीदृष्ट्या कितीही प्रबळ असले तरी इस्रायलची अर्थव्यवस्था, तेथील रोजगार आणि स्थैर्याच्या दृष्टीने हिजबुल्लासोबतचे युद्ध चांगले नाही. पण, इस्रायलमधील जनमत युद्ध थांबवण्याच्या विरोधात आहे. ’हमास’ला समूळ नष्ट करण्यासाठी काय वाटेल ती किंमत मोजावी लागली, तरी चालेल असे बहुसंख्य इस्रायली नागरिकांना वाटते. त्यासाठी हिजबुल्लाशी युद्ध करावे लागले, तरी त्यांची तयारी आहे. या युद्धाची व्याप्ती वाढणे अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांना परवडण्यासारखे नाही. आठवडाभरात अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्राथमिक फेर्‍यांना सुरुवात होणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन या युद्धामध्ये इस्रायलच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या दोन विमानवाहू युद्धनौका त्यांच्या ताफ्यासह भूमध्य समुद्रात आणल्यामुळेच इराण आणि हिजबुल्ला आजवर या युद्धामध्ये उतरण्याचे धाडस करू शकले नाहीत. पण, बायडन यांच्या पक्षातील तरूण नेत्यांचा तसेच मतदारांचा या युद्धाला विरोध आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीय आणि दक्षिण अमेरिकेतून आलेल्या लोकांमध्येही इस्रायलला यथातथाच पाठिंबा आहे. एकदा निवडणुकांच्या हंगामाला सुरुवात झाली की, इस्रायल आणि ’हमास’मधील युद्ध हे राजकीय आखाड्याचा भाग होऊन, त्यातून मार्ग काढणे अवघड होईल, याची जाणीव बायडन यांना आहे.हे घडत असताना, येमेनमधील हुती बंडखोरांनी तांबड्या समुद्रातून प्रवास करणार्‍या, जहाजांना ड्रोनच्या साहाय्याने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इराणची युद्धनौका अल बुर्ज तांबड्या समुद्रात दाखल झाली आहे. इराणकडून तांबड्या समुद्रातील व्यापारावर अवलंबून असलेल्या इजिप्त आणि आखाती अरब देशांनाही अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला आहे.

या युद्धाचे युक्रेनमधील युद्धावर तसेच अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने, ते लवकरात लवकर थांबावे, यासाठी युरोपीय देशही प्रयत्न करत आहेत. दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर गाझामध्ये हत्याकांड केल्याचा ठपका ठेवत, आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले आहे. दक्षिण आफ्रिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी याबाबतच्या नियमावलीवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. ही नियमावली १९४८ साली अस्तित्वात आली.त्यानुसार कोणताही देश दुसर्‍या देशात हत्याकांड करू शकत नाही. जगात कुठेही घडणारे हत्याकांड थांबवण्याची सर्वांची सामूहिक जबाबदारी असते. या न्यायालयात १५ न्यायमूर्ती असतात. संबंधित देश आपापले एक न्यायाधीश नेमू शकतात. गाझा पट्टीत मरण पावलेल्यांची संख्या २२ हजारांवर गेली असून, त्यासाठी दक्षिण आफ्रिकेने इस्रायलला जबाबदार धरले आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, राष्ट्र रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ’हमास’नेच गाझा पट्टीतील सामान्य लोकांना वेठीस धरले असून, त्यांचा ढालीसारखा उपयोग करण्यात येत आहे. त्यामुळे या हत्याकांडाला ‘हमास’च जबाबदार आहे. या पार्श्वभूमीवर आखाती देशांच्या दौर्‍यावर असलेल्या, ब्लिंकन यांनी अरब देशांवरही दबाव टाकला आहे. ‘हमास’ला इस्रायली बंधकांची सुटका करण्यास भाग पाडून, युद्धविराम करण्याचे प्रयत्न यशस्वी होतात का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

-अनय जोगळेकर


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.