नवी दिल्ली : प्रथमच मतदान करणाऱ्या तरूणांनी देशाच्या विकासासाठी मतदान करावे. देश आज २०४७ पर्यंत विकसित भारत बनण्याच्या ध्येयावर काम करत आहे. त्यामुळे तुमचे मत देशाची दिशा ठरविणारे असेल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) आयोजित नवमतदार संवाद कार्यक्रमात गुरूवारी केले.
तुमचे एक मत भारतातील सुधारणांचा वेग आणखी वाढवेल. एक मत डिजिटल क्रांतीला अधिक ऊर्जा देईल. ते भारताला स्वतःहून अंतराळात घेऊन जाईल आणि जगामध्ये भारताची विश्वासार्हता आणखी वाढवेल. जेव्हा स्थिर सरकार असते तेव्हा देश मोठे निर्णय घेतो. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवून पुढे जातो. पंतप्रधान म्हणाले की, आमच्या सरकारने पूर्ण बहुमताने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवून अनेक दशकांची प्रतीक्षा संपवली आणि भविष्यातही असे निर्णय घेतले जातील. आमच्या सरकारने पूर्ण बहुमताने लष्करातील जवानांसाठी वन रँक, वन पेन्शन लागू करून देशाच्या माजी सैनिकांची चार दशकांची प्रतीक्षा संपवली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणाले.
भाजपने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाने जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचनाही मागवल्या आहेत. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधान मोदींच्या वेबसाइटवरही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यासाठी पंतप्रधान मोदींनी स्वतः नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत. यासाठी युजर्स कमेंट सेक्शनवर सूचना देऊ शकतात.
‘तभी तो सब मोदी को चुनते हैं’ – भाजपचे थीम साँग
भाजपने मिशन 2024 साठी प्रचाराचे थीम साँग सादर केले. भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपच्या अधिकृत प्रचाराचा शुभारंभ केला. भाजपचे थीम साँग दोन मिनिटे 12 सेकंदांचे आहे. या गाण्यात पंतप्रधान मोदींचे काम दाखवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने आणि आकांक्षा कशा प्रकारे प्रत्यक्षात आणल्या, हे व्हिडीओतून दाखविण्यात आले आहे.